एकलहरे शिवारात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:37 AM2019-02-23T00:37:04+5:302019-02-23T00:37:33+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणवेढे शिवारात साहेबराव धात्रक यांच्या शेताजवळ मुक्कामास असलेला बिबट्या आता एकलहरे शिवारात नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे.
एकलहरे : गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणवेढे शिवारात साहेबराव धात्रक यांच्या शेताजवळ मुक्कामास असलेला बिबट्या आता एकलहरे शिवारात नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे. त्यामुळे हिंगणवेढा शिवारातून आपल्या बछड्यांसह बिबट्या आता एकलहरे शिवारात मुक्कामास आला असल्याची खात्री नागरिक लागले आहेत.
गुरुवारी सायंकाळी ७ वाजता केदू पाटील राजोळे यांच्या उसाच्या शेतातून बिबट्या रस्ता ओलांडून समोरच्या उसाच्या शेतात लपून बसल्याचे लक्षात येताच, भाऊराव केदू राजोळे, रामदास पाटील डुकरे, संदीप राजोळे आदी शेतकऱ्यांनी बिबट्या उसाच्या शेतात लपल्याचे बघून तो हुसकावून लावण्यासाठी मोठ्या फटाक्यांचे बार उडविले, परंतु त्यानंतर पुन्हा सव्वानऊ वाजता पुन्हा त्याच रस्त्यावर सुकदेव दुसिंग व बारकू दुसिंग यांना बछड्यासह बिबट्याचे दर्शन झाले. त्यावेळीही नागरिकांनी फटाके फोडल्यामुळे बिबट्याने पलायन करून समोरच्या उसाच्या शेतात आश्रय घेतला. या ठिकाणी पिलांसह बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले. हिंगणवेढ्यात मुक्कामास असलेले हे बिबट्याचे कुटुंब एकलहरेत स्थलांतरित झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंगणवेढा येथील पिंजरा वन विभागाला हलवावा लागला. आता एकलहरे शिवारात वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी आहे.
गेल्या महिन्यात शेतातील घरासमोरुन बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेऊन फडशा पाडला. त्यानंतर वाळूवाटेवरील मळ्यात कोंबड्यांचा फस्त केल्या. आता पुन्हा आमच्या जवळच्याच उसाच्या शेतात बछड्यासह बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे आम्हाला रात्री बेरात्री घराबाहेर पडणे व शेताला पाणी देणे कठीण होऊ लागले आहे.
- रामदास डुकरे-पाटील, एकलहरे