आजपासून मध्यरात्रीपर्यंत देखावे राहणार खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:05 AM2019-09-10T01:05:08+5:302019-09-10T01:05:50+5:30
गणेशोत्सवाचे मंगळवार (दि.१०) पासून अखेरचे तीन दिवस शिल्लक राहणार आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने देखावे मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
नाशिक : गणेशोत्सवाचे मंगळवार (दि.१०) पासून अखेरचे तीन दिवस शिल्लक राहणार आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने देखावे मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीतदेखील रात्री बारा वाजेपर्यंत केवळ पारंपरिक वाद्य वाजविण्यास परवानगी राहणार आहे. डीजे साउंड सिस्टिमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, डीजेचा वापर करणाºया मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार गणेशोत्सवातील अखेरचे तीन दिवस मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी अनंत चतुर्दशीपर्यंत देखावे रात्री बारा वाजेपर्यंत खुले ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रात्री दहा वाजेची अट या तीन दिवसांकरिता शिथिल करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने या परिपत्रकाच्या आधारे सांगितले. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे मध्यरात्रीपर्यंत बघण्याची संधी गणेशभक्तांना उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी उपाहारगृहदेखील मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे, जेणेकरून देखावे बघण्यासाठी येणाºया भक्तांची गैरसोय होणार नाही.
गणेशोत्सवाचे पहिले सात दिवस केवळ रात्री दहा वाजेपर्यंत देखावे मंडळांना खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
तीन दिवस गजबजणार शहर
दहा वाजेनंतर रस्त्यांवरील गर्दी कमी होत असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांचा परिसर शांत होत होता, मात्र अखेरचे तीन दिवस मंडळांच्या परिसरात भाविकांची गर्दी आणि देखावे बघण्याचा उत्साह रात्री १२ वाजेपर्यंत कायम राहणार आहे. रात्री बारा वाजेच्या ठोक्याला मंडळांना देखावे आणि पारंपरिक वाद्य मात्र काटेकोरपणे बंद करावे लागणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.