कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दक्षतेचे उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:59 PM2020-03-19T22:59:48+5:302020-03-20T00:06:36+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय तसेच ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन उपाययोजनेबाबत सूचना केल्या जात आहेत़ दरम्यान काही ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे़
नाशिक : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय तसेच ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन उपाययोजनेबाबत सूचना केल्या जात आहेत़ दरम्यान काही ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे़
निफाड तहसील कार्यालय
निफाड : कोरोना विषाणूसंदर्भात निफाड तालुक्यात केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला तहसीलदार दीपक पाटील, पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी, उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पठारे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक हर्षवर्धन मोहिते, निफाड,ओझर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सायखेडा, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे लासलगाव पिंपळगाव बाजार समितीचे सचिव, लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बस आगाराचे प्रतिनिधी, तसेच राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी कोरोना विषाणूबाबत केलेल्या आदेशाचे वाचन करण्यात आले. या आदेशाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच तालुक्यात सर्व ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन डॉ. पठारे व दीपक पाटील यांनी केले.
नगरसूल ग्रामपंचायत
नगरसूल : येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच प्रसाद पाटील यांनी केले आहे. तसेच गावात औषध फवारणी केली आहे.
सिन्नर नगर परिषद
सिन्नर : देश व राज्यात कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेने कक्षाची स्थापना केली असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली. संशयित रुग्ण आढळून आल्यास कक्षासोबत संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उपमुख्याधिकारी रोहित पगार यांची नोडल आॅफिसर म्हणून तर नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांची मेडिकल आॅफिसर म्हणून यात नियुक्ती आहे. या कक्षात नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन े करण्यात आले आहे.
दवंडीद्वारे जनजागृती
मालेगाव मध्य : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. ठिकठिकाणी दवंडीद्वारे नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बापू गांधी कापड बाजारासह गर्दीच्या ठिकाणी बंद पाळण्याचे आवाहन महापालिकेने दवंडीद्वारे केले. नागरिकांमध्येही कोरोनाविषयी जनजागृती होत आहे.