साथरोग नियंत्रणासाठी सतर्कतेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:46 PM2020-05-19T23:46:55+5:302020-05-20T00:10:01+5:30
हवामान खात्यामार्फत यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन मान्सून काळात जिल्ह्यात कोणताही साथरोग आणि कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही, याबाबत अधिक दक्षता बाळगण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिक : हवामान खात्यामार्फत यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन मान्सून काळात जिल्ह्यात कोणताही साथरोग आणि कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही, याबाबत अधिक दक्षता बाळगण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी मान्सूनपूर्व तयारीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित विभागीय आढावा बैठकीत माने यांनी अधिकाऱ्यांना सतर्कचे आदेश दिले आहेत. यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, अर्जुन चिखले, संगीता धायगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्तांनी ज्या जिल्ह्यांमध्ये पूर येण्याचा इतिहास आहे आणि चांगल्या पावसात नेहमीच अशी परिस्थिती उद्भवते त्यांनी संभाव्य पूरग्रस्त गावांची माहिती अद्ययावत ठेवावी, अशा सूचना बैठकीत केल्या.
जिल्हानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्यात यावेत, जिल्हास्तरावरील प्रत्येक विभागाने आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीप्रमाणे आपली माहिती अद्ययावत करावी,
प्रत्येक जिल्ह्यातील मान्सूनपूर्व उपाययोजना संबंधित विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने राबवाव्यात, असे ते म्हणाले.
महापालिकांना निर्देश
प्रत्येक जिल्ह्यातील महानगरपालिकांमार्फत पावसाळा सुरू होण्यापूर्वी साथीचे रोग पसरू नये यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करण्यात यावी, सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीचे रोग पसरू नये यासाठी पुरेसा औषधसाठा, पुरेशा रुग्णवाहिका, आरोग्य पथके याबाबत जिल्हा पातळीवर नियोजन करावे, अशा सूचना राजाराम माने यांनी दिल्या.