वीज कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू
By admin | Published: May 30, 2017 12:44 AM2017-05-30T00:44:15+5:302017-05-30T00:44:26+5:30
महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनाला वीज कामगारांनी पाठिंबा देत काळ्या फिती लावून काम केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : वीज उद्योगातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी नवव्या दिवशी बेमुदत कामबंद आंदोलनाला वीज कामगारांनी पाठिंबा देत काळ्या फिती लावून काम केले.
तीनही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या कंत्राटी-बाह्यस्त्रोत कामगारांना ज्येष्ठतेप्रमाणे कायम करा, रानडे समितीच्या अहवालानुसार कंत्राटी कामगारांना कायम करावे, कंत्राटी कामगारांना कायम होईपर्यंत पूर्वाश्रमीच्या विद्युत कंपनीतील रोजंदारी कामगार पद्धतीनुसार कामावर घ्यावे व शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समान काम समान वेतनाच्या निर्णयानुसार कामगारांना समान काम समान वेतन मागील फरकासह मिळावे, कामगारांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी, कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना विनाविलंब कामावर घेण्यात यावे आदि मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचे कामबंद धरणे आंदोलन चालू आहे. विद्युत भवन येथे सोमवारी दुपारी झालेल्या द्वारसभेत वीज कंपनीतील कामगारांनीदेखील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनात पाठिंबा देत काळ्या फिती लावून काम केले. धरणे आंदोलनात व्ही. डी. धनवटे, डी. आर. दाते, प्रकाश जाधव, अरुण म्हस्के, डी. एस. जाधव, बापू कुमावत, गुलाब आहेर, ललित वाघ, दीपक गांगुर्डे, सुभाष काकड, पंडित कुमावत आदि सहभागी झाले आहेत.