Nashik: उद्धव सेनेने डावलल्याने नाराज विजय करंजकर बंडखोरीच्या तयारीत? उमेदवारी अर्ज नेला, महायुतीचीही डोकेदुखी वाढणार
By संजय पाठक | Published: April 29, 2024 02:16 PM2024-04-29T14:16:03+5:302024-04-29T14:16:27+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव सेनेने वर्षभर अगोदर उमेदवारी देण्याचे अश्वासन देऊन ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने नाराज असलेले विजय करंजकर हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज नेला असून तो भरण्याची शक्यता आहे.
- संजय पाठक
नाशिक : उद्धव सेनेने वर्षभर अगोदर उमेदवारी देण्याचे अश्वासन देऊन ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने नाराज असलेले विजय करंजकर हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज नेला असून तो भरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बोलवूनही तीन वेळा करंजकर हे त्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत आणि महायुतीच्या संपर्कात गेल्यानंतर तेथून दावेदारीसाठी त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आता तेच महायुतीला देखील अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीसाठी करंजकर यांना संधी देण्यात आली. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी ही नियुक्ती केलीच नाही. त्यामुळे सहानुभूती म्हणून करंजकर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी हाेती. शिवसेनेने देखील तसे संकेत दिले होते. त्यानुसार संपर्क मोहिमा राबविणाऱ्या विजय करंजकर यांना उमेदवारी आपलीच वाटत असताना ऐनवेळी शिवसेनेने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी त्यांनी बंडखोरीची तयारी केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांना ते भेटलेच नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेऊन त्यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र आता त्यांनी उमेदवारी अर्ज नेला असून त्यामुळेच बंडखोरीची चर्चा सुरू आहे.