विजयनगरला डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:50 PM2017-10-29T23:50:33+5:302017-10-30T00:29:15+5:30
गेल्या काही महिन्यांत विजयनगर परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून, यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे.
भगूर : गेल्या काही महिन्यांत विजयनगर परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून, यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: विजयनगर परिसरात अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्याबरोबरच रुग्णांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कॅम्प परिसरातील कॉलनी परिसरात अर्धवट स्थितीत असलेले बांधकाम तसेच मोकळे भूखंड येथे पाण्याचे डबके साचलेले आहे. अर्धवट स्थितीत बांधकाम असल्याने याठिकाणी असलेल्या उघड्यावरील पाण्याच्या टाक्या आणि डबक्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. मोकळ्या भूखंडावर वाढलेले गवत आणि स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे आजारात वाढ झाली आहे. दीड महिन्यापूर्वीच कॉलनी परिसरातील एका मुलीला डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळले होते. त्यावेळी परिसरातील स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. परिसरातील अनेक लोक आजारी असून, अनेकांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात देखील अनेकांवर उपचार सुरू आहेत. अर्धवट स्थितीतील बांधकामाकडे झालेले दुर्लक्ष, छावणी परिषदेने स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे; मात्र त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने पुरेशी स्वच्छता नसल्याची देखील नागरिकांची तक्रार आहे.
आरोप-प्रत्यारोप
कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेल्या विजयनगरसह आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळत असताना छावणी परिषदेतील आजी-माजी उपाध्यक्ष आणि सदस्य एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. आरोग्याच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा भ्रष्टाचार आणि नोकरभरती आणि इतर अन्य विषयांवर बोलण्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याविषयी त्यांना कळकळ नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कामकाज आणि प्रशासन चालविणे या दोन्ही आघाड्यांवर संबंधितांनी कामकाज केले तर आरोग्याचा प्रश्न सुटू शकेल, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.