विलास बिरारी यांना अटक; ७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी ओझर पार्टी : पोलिसांनी बिरारी यांना प्रमुख सूत्रधार ठरविले
By admin | Published: February 6, 2015 01:31 AM2015-02-06T01:31:21+5:302015-02-06T01:31:21+5:30
विलास बिरारी यांना अटक; ७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी ओझर पार्टी : पोलिसांनी बिरारी यांना प्रमुख सूत्रधार ठरविले
नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळावरील सेवानिवृत्तीची साग्रसंगीत पार्टी आयोजित करणे विमानतळाचा ठेका घेणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक व बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विलास बिरारी यांच्या चांगलेच अंगलट आले असून, काल (दि.५) ते स्वत:च दिंडोरी तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे पोलिसांनी विलास बिरारी यांना या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार ठरविले असून, आधी दाखल केलेल्या गुन्'ात आणखी एक कलम वाढविले आहे. याआधी आॅर्केस्ट्रा संचालक सुनील ढगे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. काल (दि.५) याप्रकरणी ओझर येथील पार्टीचे आयोजन करणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी दिंडोरी पोलिसांना शरण आले. त्यानंतर विलास बिरारी यांना अटक करून दिंडोरी तालुका पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता सरकारपक्षातर्फे अॅड. स्वाती कबनूरकर यांनी युक्तिवाद मांडताना विलास बिरारी यांना चार दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. सदर प्रकार गंभीर असून, विना जामीनपात्र असल्याचे तसेच या घटनेतील विलास बिरारी हे प्रमुख सूत्रधार असून, संवेदनशील क्षेत्रात वाद्य वाजवून तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. या घटनेत वापरलेल्या वस्तु व साहित्य जप्त करण्यासाठी तसेच या प्रकरणी सहभागी झालेले अन्य जणांचा शोध घेण्यासाठी चार दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शाहीन गडकरी यांनी विलास बिरारी यांना तीन दिवस ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)