विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:45 AM2019-05-12T00:45:49+5:302019-05-12T00:46:04+5:30
रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले
विल्होळी : रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले असून, अर्धवट झालेल्या या कामांमुळे रस्त्यावरील धूळ रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्न- पाण्यात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यात टाकण्यात आलेल्या खडीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जखमी झाले आहेत. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी विल्होळी व बेलगाव ढगा येथील ग्रामस्थांनी केली आहे.
विल्होळी-बेळगाव या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी सदरचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु गेल्या महिन्यापासून अचानक काम बंद पडले असून, रस्त्याच्या कडेला साहित्य तसेच पडून आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, ठेकेदार दाद देत नसल्याने त्याचा खुलासा होऊ शकला नाही, तथापि चौकशीअंती बाजारात खडीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
खडी मिळत नसल्याने काम बंद
रस्त्याच्या कामासाठी साहित्याची टंचाई निर्माण झाली आहे. खडी मिळत नसल्याने ठेकेदाराने काम बंद केले. त्याचबरोबर निवडणूक व लग्नसराईमुळेदेखील कामगार गावाकडे निघून गेल्याने काम सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अर्धवट रस्त्यामुळे मात्र रस्त्याच्या कडेला राहणाºया शेतकरी, कंपन्यांच्या गुदाममधील कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रचंड धूळ असल्याने नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाळ्याच्या आत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण व्हावे. एक महिन्यापासून रस्त्याचे काम बंद आहे. ठेकेदारास फोन केला असता, ते फोन उचलत नाहीत. याकडे बांधकाम खात्याने लक्ष देऊन काम त्वरित चालू करावे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून चिखल तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने काम पूर्ण व्हावे.
- दत्तात्रय ढगे, सरपंच, बेळगाव ढगा
दहा ते पंधरा दिवसांपासून काम बंद आहे. खडी उपलब्ध नाही. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामगार लग्नासाठी बाहेरगावी गेल्यामुळे काम बंद आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम चालू होईल, परंतु डांबरीकरण पावसाळ्यानंतर होईल.
- यश खैरनार, ठेकेदार