विल्होळीला कुस्त्यांची दंगल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:52 AM2019-05-23T00:52:30+5:302019-05-23T00:52:46+5:30
विल्होळी येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांचे आयोजन विल्होळी ग्रामस्थ व यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले.
विल्होळी : विल्होळी येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांचे आयोजन विल्होळी ग्रामस्थ व यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले. यात मानाची कुस्ती बरोबरीत झाल्याने दोन्ही कुस्तीपटूंना समान बक्षिसाचे वाटप करण्यात आले, तर महिलांच्या कुस्त्यांमध्ये मुलींनी बाजी मारली.
या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सार्थक नेहेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हा तालीम संघ उपाध्यक्ष वाळू नवले, संजय चव्हाण, बबन गायकवाड, भास्कर थोरात, पुंजा निंबेकर, बाबुराव रुपवते, नामदेव भावनाथ, बंडू चव्हाण, पुंडलिक सहाणे, निवृत्ती देशमुख, भिकाजी मते आदी उपस्थित होते.
महिलांच्या कुस्त्या बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे यांच्या हस्ते लावण्यात आल्या. यामध्ये भगूर येथील कुमारी प्रतीक्षा भालेराव, गायत्री झांजरे तर साकूर फाटा येथील मानसी बिरछे या मुलींनी कुस्ती करत पारितोषिक व रोख रक्कम मिळवली. पंच म्हणून संजय गायकवाड, मोहन भवनाथ, कैलास भावनाथ, वाळू नवले यांनी काम पाहिले.
कुस्त्यांना सुरुवात होऊन प्रथमत: बालगोपाळांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. मानाची कुस्ती स्व. उत्तमराव ढिकले यांच्या स्मरणानार्थ चांदीची गदा व रोख रकमेची कुस्ती पिंपळदचे पहिलवान संदीप बोडके व पिंपळगाव बहुला येथील श्रीनाथ सानप यांच्यात होऊन अखेरीस कुस्ती चितपट न झाल्याने पंचांच्या निर्णयानुसार दोन्ही पहिलवानांना समान बक्षीस वाटप करण्यात आले.