भडाणे गावाने मिळविले कोरोनाला रोखण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:47+5:302021-05-19T04:14:47+5:30
चांदवड (महेश गुजराथी) : शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याने तालुक्यातील भडाणे गावाने कोरोनाला रोखण्यात यश मिळविले. ...
चांदवड (महेश गुजराथी) : शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याने तालुक्यातील भडाणे गावाने कोरोनाला रोखण्यात यश मिळविले.
गाव कोरोनामुक्त होण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमास बंदी घालण्यात आली व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी महेश पाटील, पंचायत समिती सदस्य ज्योती आहेर, विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सॅनिटायझर वाटप करण्यात आले व गावात सोडियम हायपोक्लोराईडची वेळोवेळी फवारणी करण्यात आली. कोरोना संसर्ग बाधित झालेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन या आजाराची लक्षणे व त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम सरपंच कमळाबाई आहेर, ग्रामसेवक हेमंत शिरसाठ, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी व ऑपरेटर यांच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच गावातील काही कोरोनाबाधित रुग्णांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलगीकरण करण्यात आले. तेथे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, लाईट व इतर सुविधा होत्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत गावातील एकूण ३९९ कुटुंबांपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी व ऑपरेटर यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल व ताप मोजणी यंत्राच्या साह्याने सर्व्हे करण्यात आला. जे कुटुंब व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती संशयित आढळल्या, त्यांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निंबाळे, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव रोही व उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. भडाणे या गावाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरणाचा कॅम्प आयोजित करून १२० इतक्या ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले आहे.
भडाणे गावात पंचायत समिती सदस्य ज्योती आहेर, ग्रामसेवक हेमंत शिरसाठ, आशा कार्यकर्ती मनीषा गांगुर्डे, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे व सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेऊन गाव पातळीवरील सर्व कर्मचारी वर्गाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे.
-कमळाबाई आहेर, सरपंच (१८ कमळाबाई आहेर) (१८ चांदवड)