कळवणला गावांचा संपर्क तुटला
By admin | Published: August 4, 2016 12:46 AM2016-08-04T00:46:19+5:302016-08-04T00:49:02+5:30
नद्यांना पूर, पूल तुटले, फरशीचे भराव वाहून गेले, रस्ते खचले, तालुक्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
कळवण : तालुक्यातील धरण लाभक्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी- नाल्यावरील पूल तुटले, फरशीचे भराव वाहून गेले, रस्ते वाहून गेल्याने साकोरे भागातील तसेच भौती, उंबरदे, ततानी, शेपूपाडा, जिरवाडे, शृंगारवाडी, वीरशेत, मांगलीदर आदि भागातील आदिवासी जनतेचा आणि गावांचा संपर्कतुटला आहे.
चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून हजारो क्यूसेक पूरपाणी सोडण्यात आले असून, गोबापूर, नांदुरी, बोरदैवत, धार्डे दिगर, मळगाव चिंचपाडा, भांडणे, खिराड, मार्कंड पिंप्री, धनोली, भेगू, जामले वणी, ओतूर आदि लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पूरपाणी नदीपात्रात सोडण्यात आले असल्याने कळवण, तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी नद्यांना यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आल्याने या नद्यांवरील सर्व पूल वाहून गेले आहेत, भराव वाहून गेले तर काही ठिकाणी रस्तेच गायब झाल्याने पायी वाटचाल करणेदेखील जनतेला अवघड होऊन बसले आहे.
साकोरे येथील बंधारा वाहून गेल्याने या बंधाऱ्यालगत असलेल्या साकोरे येथील ५० शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतमाल घेऊन जाणे अवघड होऊन बसले आहे. साकोरे येथील महादेव मंदिराकडील रस्ता नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साकोरे येथील वाहून गेलेल्या बंधाऱ्याची व रस्त्याची चौकशी केली नसल्याने साकोरे येथील शेतकरी गोरख देवरे यांनी नाराजी व्यक्त करीत गावाशी संपर्क साधण्यासाठी रस्ता दुरूस्त करून देण्याची मागणी केली आहे.
कळवण तालुक्यातील आदिवासी व दुर्गम अतिदुर्गम भागातील रस्ते उखडून गेले आहेत.
रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. संपूर्ण तालुका खड्डेमय झाला असून, डोंगर उतावरील पाण्याबरोबर मातीदेखील वाहून येत असल्याने रस्ते चिखलमय झाले असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. डोंगर उतारावरील रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून, संपर्क तुटला आहे. गावागावांच्या नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे व नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यावरील फरश्यादेखील वाहून गेल्या आहेत.
आदिवासी भागातील भौती- उंबरदे रस्त्यावरील पुनंद नदीवरील पूल तुटल्याने आदिवासी गावांचा व पाड्यांचा संपर्क तुटला आहे. तांबड्या नदीच्या पुलावरील भराव वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून, तताणी- शेपूपाडा रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूचे भरावदेखील वाहून गेल्याने या भागातील दहा ते बारा गाव, खेड्यापाड्यातील आदिवासी जनतेचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे, तर शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना रस्ते बंद झाल्याने शाळा, महाविद्यालयातील शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. (वार्ताहर)