ग्रामविकास अधिकारी बदलीचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 09:26 PM2020-06-07T21:26:16+5:302020-06-08T00:22:41+5:30
इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे यांची बदली करण्यात आली. त्यामुळे ग्रामपालिका पदाधिकारी आक्र मक झाले असून, प्रशासनाने घोटी ग्रामविकास अधिकारी यांची बदली रद्द करावी अन्यथा ११ जूनपासून इगतपुरी पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलीच्या निषेधार्थ घोटी शहर बंद ठेवण्यात आले.
घोटी ग्रामपालिकेने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून घोटी ग्रामपालिकेत ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगले काम करणाºया उत्तम शेटे, ए. एस. चौधरी यांच्या बदल्या झाल्या. पाच महिन्यांपूर्वी के. बी. दळवे यांच्याकडे घोटी ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारीपदाचा कार्यभार देण्यात आला. त्यांनी उत्तम सेवा दिली. तसेच घोटी शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी विविध कामांचे नियोजन केले असून, शहराच्या मूलभूत सुविधा व सेवा देण्यात ते मोलाची भूमिका बजावत आहेत, असे असताना प्रशासनाने त्यांची बदली केल्याने घोटी शहरात विकासकामांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे ही बदली तत्काळ रद्द करण्याची मागणी प्रभारी सरपंच संजय आरोटे यांच्यासह सदस्य रामदास भोर, सचिन गोणके, रवींद्र तारडे, गणेश गोडे आदींनी केली आहे.
वर्षभरात घोटी ग्रामपालिकेत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर ए. एस. चौधरी यांची नेमणूक झाली. तेही चांगले काम करीत असताना सहा महिन्यांत त्यांचीही बदली करण्यात आली. त्यानंतर पाच महिन्यांपूर्वीच के. बी. दळवे यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांच्याकडूनही घोटीचा कार्यभार काढून घेऊन रवींद्र धुंदाळे यांच्याकडे देण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आम्ही ग्रामविकास अधिकारी दळवे यांची बदली रद्द करावी, घोटीचा कार्यभार व मुख्यालय त्यांच्याकडेच द्यावे या मागणीसाठी शहर बंद ठेवून बेमुदत उपोषण करणार आहोत.
- संजय आरोटे, प्रभारी सरपंच, घोटी
घोटी ग्रामपालिकेत वरिष्ठ प्रशासनाकडून वर्षभरात तीन ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे घोटी शहराच्या विकासाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विद्यमान ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे यांच्याकडून चांगले काम व घोटी शहराच्या विकासात हातभार लागत असतानाच त्यांच्याकडून अल्प कालावधीत कार्यभार काढून घेतला आहे. ग्रामविकास अधिकारी दळवे यांच्याकडेच घोटी ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारीपदाचा कार्यभार कायम करण्यात यावा.
- रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य, घोटी