ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्तीच्या हालचाली
By admin | Published: April 25, 2017 02:21 AM2017-04-25T02:21:54+5:302017-04-25T02:22:03+5:30
नाशिक : तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्ती करण्यात येणार असून, प्रस्ताव ग्रामपंचायतींना पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक : प्रत्येक घरापर्यंत वीज पोहचविण्यासाठी आखण्यात आलेल्या नियोजनाचा भाग म्हणून तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्ती करण्यात येणार असून, तसे प्रस्ताव ग्रामपंचायतींना पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सर्वांसाठी वीज या धोरणाचा भाग म्हणून प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीच्या ठिकाणी वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यासाठी तीन हजार लोकसंख्येच्या भागात त्याच गावातील ग्रामविद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. संबंधित ग्रामपंचायत महावितरणी फ्रॅन्चायजी म्हणून काम करणार असल्याने या कामाच्या नियोजनासाठी ग्राम व्यवस्थापक नियुक्त करण्यात येणार आहे.
प्रस्ताव महावितरणच्या विभागीय कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारच्या ऊर्जा व ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे एक गाव एक ग्राम विद्युत व्यवस्थापक ही योजना हाती घेतली आहे.
विद्युत सहायकांची संख्या कमी झाल्याने ग्रामीण भागात वीज पुरवठ्यातील अडचणी सोडविण्यात येणारे अडथळे लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. मराठी विषय घेऊन इयत्ता दहावी उत्तीर्ण व आयटीआय (विद्युततंत्री) किंवा इलेक्ट्रीकल विषयात अधिक शिक्षण घेतलेले उमेदवार ग्राम विद्युत व्यवस्थापक या पदासाठी पात्र आहेत. (प्रतिनिधी)