गावठी दारुचा चालता-फिरता अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:14 AM2021-04-21T04:14:22+5:302021-04-21T04:14:22+5:30
--- नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मद्यविक्रीवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. मद्यविक्री बंद असल्याने अवैधरित्या मद्यविक्रीचा वारंवार प्रयत्न ...
---
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मद्यविक्रीवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. मद्यविक्री बंद असल्याने अवैधरित्या मद्यविक्रीचा वारंवार प्रयत्न होत असल्याचे उघडकीस आले आहे. चुंचाळे शिवारात चक्क रिक्षांमधून सर्रास गावठी मद्यविक्री केली जात होती. पोलिसांनी हा गावठी दारू विक्रीचा चालता-फिरता अड्डा उदध्वस्त करत दोघा संशयितांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वीच गंगापूर रोड भागामध्ये चक्क सायकलवरून देशी विदेशी मद्याच्या बाटल्यांची वाहतूक केली जात होती. ही अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली होती. यानंतर चुंचाळे भागामध्ये चक्क एका रिक्षामधून गावठी स्वरूपाचे मद्य विकले जात होते. या संदर्भात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत संचारबंदी काळात सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रीला चाप लावला.
चुंचाळे परिसरातील कारगिल चौक येथे दोन रिक्षांमधून गावठी दारू सर्रासपणे विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने सापळा रचून शिताफीने संशयित विशाल संजय भदरगे (२०, रा. गरवारे पॉइंट) व संदीप युवराज
सैदाणे (२५, रा. दत्तनगर, चुंचाळे) यांना ताब्यात घेतले. त्यांनी कारगिल चौक
परिसरात दोन रिक्षातून गावठी दारूची विक्री करत असल्याची कबुली चौकशीत दिली.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील दोन्ही रिक्षांंची तपासणी केली असता गावठी दारूने भरलेले ५० हजार रुपये किमतीचे मोठे कॅन आढळून आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.