ग्रामपंचायतीचा कर थकविला; सरपंचासह ११ सदस्य अपात्र
By धनंजय वाखारे | Published: October 6, 2023 07:55 PM2023-10-06T19:55:19+5:302023-10-06T19:55:37+5:30
नाशिक जिल्ह्यातील लोहोणेर ग्रामपंचायतीतील प्रकार
पंडित पाठक, लोहोणेर (नाशिक) : देवळा तालुक्यातील लोहोणेर ग्रामपंचायतीच्या विद्यमान १७ पैकी ११ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा करभरणा विहीत मुदतीत न केल्याने मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी या सदस्यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरविण्याचा निकाल बुधवारी (दि.४) जाहीर केला आहे. यामध्ये विद्यमान सरपंचांसह दोन माजी सरपंच-उपसरपंचांचा समावेश आहे.
या निकालामुळे ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाला मोठा हादरा बसला आहे. ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी मोहीम सुरू केली होती. परंतु १७ पैकी ११ सदस्यांनीच ग्रामपंचायतीचा कर भरला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लोहोणेर येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान महाजन यांनी सदर ११ सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे यासाठी दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
त्यात सदस्यांनी बिले दिल्यापासून मुदतीत तीन महिन्यांच्या आत कर भरणा करण्यात कसूर केल्याची बाब सिद्ध झाल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( ह ) नुसार अपर जिल्हाधिकारी यांनी लोहोणेर ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांना आपल्या पदाच्या उर्वरित कालावधीसाठी अपात्र / अनर्ह ठरविण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे.
या सदस्यांना ठरवले अपात्र
लोहोणेर ग्रामपंचायतीचे विद्ममान सरपंच सतीश विश्वासराव सोमवंशी, तत्कालीन सरपंच रतीलाल बन्सीलाल परदेशी, तत्कालीन उपसरपंच श्रीमती विजया दत्तात्रेय मेतकर, सदस्य दिलीप महाळू भालेराव, दीपक काशिनाथ बच्छाव, माजी सरपंच पूनम योगेश पवार, उषाबाई गुलाब सोनवणे, भाऊसाहेब मंगा गायकवाड, धोंडू धर्मा अहिरे, सविता गणेश शेवाळे, रेश्मा रमेश महाजन.