मध्य प्रदेशमधून गावठी पिस्तुलांची तस्करी उधळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 01:31 AM2020-12-24T01:31:30+5:302020-12-24T01:31:52+5:30
आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांना काही तालुक्यांमध्ये अवैध शस्रास्रांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आले होते. लासलगावात एका संशयिताला पोलिसांनी छापा टाकून अटक केली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तुलासह पाच काडतुसे जप्त केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी छडा लावत तब्बल ११ संशयित आरोपींना गावठी कट्ट्यांच्या खरेदी-विक्रीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६ गावठी पिस्तूल ८ मॅग्झिनसह ३२ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
नाशिक: आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांना काही तालुक्यांमध्ये अवैध शस्रास्रांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आले होते. लासलगावात एका संशयिताला पोलिसांनी छापा टाकून अटक केली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तुलासह पाच काडतुसे जप्त केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी छडा लावत तब्बल ११ संशयित आरोपींना गावठी कट्ट्यांच्या खरेदी-विक्रीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६ गावठी पिस्तूल ८ मॅग्झिनसह ३२ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
मालेगाव, चांदवड, येवला, लासलगाव या तालुक्यांमधील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी तपासचक्रे फिरविली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे लासलगावातून संशयित विपुल यमाजी आहिरे यास एरिगेशन कॉलनीमध्ये छापा टाकून अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांनी गावठी पिस्तूल व पाच काडतुसे मिळून आली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गावठी पिस्तूल देणारा मध्य प्रदेशमधील म्होरक्या तसेच अन्य खरेदीदारांची माहिती पोलिसांकडे उघड केली. यावरून तांबे यांनी त्वरित सहायक निरिक्षक राहुल वाघ, उपनिरिक्षक रामकृष्ण सोनवणे, हवालदार भागवत पवार, दौलत ठोंबरे आदींचे पथक तयार करुन गावठी पिस्तुलांची तस्करीची साखळी खिळखिळी करण्याच्या सुचना केल्या. पोलिसांनी सापळा लावून संशयित संतोष ठाकरेकडून (रा.विंचूर) दोन गावठी पिस्तूल, १४ काडतुसे, केशव माधव ठोंबरे (रा.पिंपळद) याच्याकडून एक गावठी कट्टा व चार काडतुसे तसेच संशयित सागर वाघकडू एक गावठी कट्टा व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. एकूण ११ संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
--इन्फो--
एजंट, हेल्परांच्याही बांधल्या मुसक्या
गावठी पिस्तूल व काडतुसे बाळगणाऱ्या संशयित चौघांच्या संपर्कात राहून संभाव्य खरेदीदार शोधून देणे तसेच पिस्तुलांच्या वाहतुकीसाठी मदत करणारे संशयित दीपक पोळ, पंकज चंद्रकांत वानखेडे, विनोद सोपान तांबे, अजीम अल्ताफ शेख, करण जेऊघाले, पवन आनंद नेटारे यांच्याही मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यात पोलिसांना सराईत गुन्हेगार सायमन ऊर्फ पापा पॅट्रिक मॅनवेलसह मध्य प्रदेशामधील उमर्टी गावातून देशी पिस्तूल, काडतुसांचा पुरवठा करणारा म्होरक्या शेखर भाई यांना अटक करण्याचे आव्हान आहे.
---इन्फो--
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता
ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह मनमाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध शस्रे बाळगणारे तसेच तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या संभाव्य समाजकंटक पोलिसांच्या रडारवर असल्याचे सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले