विंधनविहिरीस पाणी लागल्याने ग्रामस्थांत समाधान
By admin | Published: February 20, 2016 09:30 PM2016-02-20T21:30:44+5:302016-02-20T21:32:43+5:30
विंधनविहिरीस पाणी लागल्याने ग्रामस्थांत समाधान
येवला : तालुक्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत असून, पूर्वभागात पाण्यासाठी कायमच भटकंती करावी लागते. २ ते ३ किलो मीटरवरून महिला व पुरुषांना पाणी आणावे लागते. या पार्श्वभूमीवर तळवाडे येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती योजनेअंतर्गत व जनरल वस्ती योजना १० टक्के निधी अंतर्गत घेण्यात आलेल्या विंधनविहिरीस पाणी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पाणीपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
भूजल विभागाकडून पाणी चाचणी घेऊन राजापूर गटात विंधननविहिरी करण्याचे नियोजन केले आहे. शासन नियमाप्रमाणे ग्रामपंचायत प्राप्त झालेल्या १४व्या आयोगाची रक्कम पाण्यासाठी खर्च करावयाची आहे. त्यात विहीर खोलीकरण, पाणीपुरवठा लाइन दुरुस्ती, पाण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसा ठरावही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला असल्याचे जि.प. सदस्य प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. तळवाडे येथे नुकत्याच झालेल्या दोन विंधनविहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याने गावातील दलित वस्तीतील व गावातील इतर महिलांची होणारी पायपीट थांबणार आहे. पाणी लागल्याने गावाने मोठ्या उत्साहाने पाणी पूजन केले. याप्रसंगी तळवाडेचे सरपंच रंजनाबाई पगारे, उपसरपंच अनिल आरखडे, बाळासाहेब आरगडे, निसमा पटेल, अनिल आरखडे, जमील पटेल, बाबासाहेब आरखडे, अमिन पटेल, सोमनाथ आरखडे, नाना पगारे, अशोक पगारे, युनुस पटेल आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)