बिबट्याच्या दहशतीने गाव रात्रभर जागे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:03 PM2020-08-08T22:03:44+5:302020-08-09T00:13:00+5:30
सिन्नर : शहराजवळील सरदवाडीच्या ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र जागून काढली. बिबट्याने गावात दोनदा शिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ जागेच असल्याने आरडाओरड करून त्यांनी त्याला हुसकावून लावले. उग्र वासामुळे बिबट्या जवळपास असल्याची खात्रीशीर माहिती माहेरी आलेल्या महिलेने दिल्यानंतर ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली.
सिन्नर : शहराजवळील सरदवाडीच्या ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र जागून काढली. बिबट्याने गावात दोनदा शिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ जागेच असल्याने आरडाओरड करून त्यांनी त्याला हुसकावून लावले. उग्र वासामुळे बिबट्या जवळपास असल्याची खात्रीशीर माहिती माहेरी आलेल्या महिलेने दिल्यानंतर ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली.
नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासलगत व शहरापासून अवघ्या शंभर फूट अंतरावर असलेल्या सरदवाडी येथे बछड्यासह तीन बिबट्यांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. महिनाभरापासून बिबट्याचा परिवार सरदवाडी शिवारात वास्तव्यास आहे. सिन्नर बायपासवरही त्याचे अनेकदा दर्शन झाले आहे. वस्तीवरील पाळीव श्वान बिबट्याचे भक्ष्य होऊ लागले आहेत.
बिबट्याचा गावात शिरण्याचा दुसराही प्रयत्न अपयशी
मध्यरात्री १ वाजता पुन्हा बिबट्याने गावात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशांत शिरसाट याने बिबट्याला पाहताच जागे असलेल्या ग्रामस्थांना आवाज दिला. सागर शिरसाठ, योगेश रेवगडे, शरद बोंबले, संदीप शिरसाट, कृष्णा बोराडे, अक्षय शिरसाठ, प्रशांत शिरसाट, शरद शिरसाट, अमित शिरसाट, संतोष शिरसाट यांच्यासह ग्रामस्थांनी पुन्हा बिबट्याला हुसकावून लावले. उग्र वासावरून ओळखले बिबट्याचे वास्तव्य
माजी सरपंच बजुनाथ शिरसाठ यांची मुलगी चित्रा रक्षाबंधनासाठी सरदवाडी येथे आली आहे. चिकणी (ता. अकोले) येथे सासरी परिसरात बिबट्यांचे वास्तव्य कायम असल्याने बिबट्याचा उग्र वास तिला लगेच समजून येतो. मंगळवारी रात्री ९ वाजता चित्रा घराबाहेर आली असता बिबट्याचा उग्र दर्प तिने ओळखला. तिने घरात पळत जाऊन बिबट्या जवळपास असल्याची माहिती दिली. सर्वांनी बाहेर येऊन गावातील ग्रामस्थांना आवाज दिला. जमा झालेल्या तरुणांनी बॅटरीच्या उजेडात बिबट्याचा शोध घेणे सुरू केले असता घराजवळच बिबट्याचे दर्शन झाले.परिसरात पिंजरा लावण्याची मागणी
महिनाभरापासून बिबट्याचे कुटुंब परिसरात वास्तव्यास आहे. शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत असल्याने शेतकामे करणे अवघड झाले आहे. वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.