कृषी सहायकाला ग्रामस्थांनी बांधले
By admin | Published: March 2, 2016 11:26 PM2016-03-02T23:26:39+5:302016-03-02T23:30:20+5:30
अवकाळी पाऊस : ३०० एकर पिकांचे नुकसान
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील गहू, द्राक्ष आणि टमाटा या पिकांना मोठा फटका बसला असून, लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. इगतपुरी तालुक्यातील खेड जिल्हा परिषद गटात सुमारे ४०० ते ५०० एकरवरील टमाटा, कांदा, गहू व फ्लॉवरला फटका बसला आहे. तर नाशिक तालुक्यातील सिद्धप्रिंपी गावात एका शेतकऱ्याची संपूर्ण द्राक्षबाग कोेलमडून पडल्याने सात लाखांचे नुकसान झाल्याची माहिती उपसभापती अनिल ढिकले यांनी दिली.
बुधवारी (दि. २) सकाळीच आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य सुजाता सुनील वाजे, प्रांत बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार महेंद्र पवार, पंचायत समिती सदस्य पांडुरंग वारुंगसे, हरिदास लोहकरे, तालुका कृषी अधिकारी शेवाळे यांनी इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव, वासाळी, इंदोरे, खडकेद, बारशिंगवे, सोनोशी, मायदरा, टाकेद यांसह १५ ते २० गावात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी एकरी एक लाख रुपये कर्ज काढून लावलेल्या टमाटा, कांदा, फ्लॉवर, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची कैफियत आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर मांडली. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे यांनी नुकसानग्रस्त शेतपिकांचे व शेतमालाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे आदेश यंत्रणेला दिले. एकट्या खेड जिल्हा परिषद गटात ३०० एकरवरील टमाटा तसेच गहू व फ्लॉवरचे नुकसान झाले आहे. खेड गावात एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे नाशिक तालुक्यातील सिद्ध्रपिंप्री येथे गारपीट व वादळी वाऱ्यामुळे गावातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी पंचायत समितीचे उपसभापती अनिल ढिकले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. गावातील गणेश राजोळे या शेतकऱ्याची संपूर्ण द्राक्षबाग वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडल्याने सहा ते सात लाखांचे नुकसान झाल्याचे अनिल ढिकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)