चंदनचोरांना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:18 AM2019-07-12T00:18:56+5:302019-07-12T00:19:55+5:30
देवळाली कॅम्प परिसरात चंदन झाडाची चोरी करणाऱ्या आरोपींना देवळाली कॅम्प पोलिसांच्या गस्ती पथकाने शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प परिसरात चंदन झाडाची चोरी करणाऱ्या आरोपींना देवळाली कॅम्प पोलिसांच्या गस्ती पथकाने शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून नागरी वस्तीसह लष्करी हद्दीत चंदनचोरांनी धुमाकूळ घातला होता. पोलीस त्यांच्या मागावर असतानाच भगूर परिसरात तीन इसम एक चंदनाचे झाड तोडत असताना बीट मार्शल अनिल आहेर यांनी बॅटरीच्या प्रकाशात तिघांना हटकले असता ते पळू लागले. अंधाराचा फायदा घेत दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र बाळू भानुदास पवार (रा. पिंपळगाव, ता. संगमनेर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने साथीदार बारकू दुधवडे (रा. देसावडे, ता. पारनेर) व संजय रमेश सूर्यवंशी (रा. चिखली, ता. संगमनेर) अशी नावे सांगितली. तसेच तोडलेले चंदनाचे झाडे संजय किसन डोके (रा. साकूर, ता. संगमनेर) यांना देत असल्याचे सांगितले. फरार चोरटे व माल घेणारा यांच्या शोधासाठी गुन्हे शोध पथक नगर येथे गेले असता धारगाव पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींकडून माहिती घेतली असता भानुदास पवार याचे नातेवाईक पोपट रत्नाकर बर्डे (रा. लहवित) हा आरोपींना चंदनाची झाडे कोठे आहे याची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले.
यापूर्वी लष्करी रुग्णालय व परिसरातील चंदनाची झाडे तोडल्याचे त्यांनी कबूल करत बर्डे याच्याकडे लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून बाळू पवार, संजय सूर्यवंशी, पोपट बर्डे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून करवत, मोटारसायकल व चंदनाचे लाकूड जप्त केले आहे. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, वपोनि देवीदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. आर. जाधव, मुठाळ, अनिल आहेर, श्याम कोटमे, सुदाम झाडे, सुभाष जाधव आदींनी पार पाडली.