कारसूळ परिसरात बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थ भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:02 PM2020-12-17T16:02:29+5:302020-12-17T16:04:03+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसूळ येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे.
पिंपळगाव बसवंत परिसरातील कारसूळ, वडाळीनजीक, नारायण टेंभी या गावांच्या परिसरातून कादवा नदी वाहते. नदीकाठी मोठमोठी झाडे-झुडूपे आहेत. त्यामुळे बिबट्यांसाठी हा परिसर सुरक्षित असल्याने अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा या परिसरात वावर आहे. वनविभागाने वारंवार पिंजरा लावून अनेक बिबट्यांना जेरबंद देखील केले आहे. वडाळीनंतर नारायण टेंभी येथेही बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. मात्र उर्वरित बिबट्यांनी आपला मोर्चा कारसूळ गावाकडे वळविला असल्याने आठवडाभरात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी येथील शेतकरी भाऊसाहेब उगले, प्रवीण ताकाटे, उमेश ताकाटे, संदीप गटकळ यांनी केली आहे.
दोन दिवसात पिंजरा लावू....
निफाड तालुक्यात बिबट्यांचा वावर अधिक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. दोन दिवसांत गरज नसलेल्या ठिकाणचा पिंजरा काढून तो कारसूळ येथे लावण्यात येईल.
- संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक
बिबट्याला जेरबंद करावे
कारसूळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. मी स्वतः बुधवारी बिबट्याला बघितले. सध्या द्राक्ष बागांची कामे सुरू असल्याने बिबट्यापासून शेतकरी आणि मजुरांच्या जीवाला धोका आहे. यासाठी बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे.
- सोमनाथ देवरे, शेतकरी, कारसूळ