कोविड लस घेण्यास ग्रामस्थांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 09:55 PM2021-05-06T21:55:37+5:302021-05-07T00:49:13+5:30
खामखेडा : खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर अल्पशा प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण न करताच नागरिकांना माघारी फिरावे लागले.
खामखेडा : खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर अल्पशा प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण न करताच नागरिकांना माघारी फिरावे लागले.
गेल्या सहा दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्याने खामखेडा येथील आरोग्य केंद्रात लसीकरण बंद होते. बुधवारी (दि. ५) देवळा तालुक्याला एक हजार लसी मिळाल्याने यामधील खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रास दोनशे लस तालुका स्तरावरून देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रास लस आल्याचे समजताच लस घेण्यासाठी भऊर, सावकी, विठेवाडी व खामखेडा येथील नागरिकांनी आरोग्य केंद्रावर गर्दी केल्याने आरोग्य केंद्राच्या आवारात रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना नागरिक दिसत नव्हते.
सुरुवातीला या लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु लसीकरण झालेल्या नागरिकांची कोरोना प्रतिकारशक्तीत वाढ झाल्याचे दिसून आल्याने नागरिकांना कोविड लसीचे महत्त्व लक्षात आल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.
कोविडच्या मिळालेल्या लसींपैकी ७० टक्के लस ही दुसऱ्या लसीचा डोस घेणाऱ्यांसाठी आणि ३० टक्के लसी पहिल्या डोस घेणाऱ्यांसाठी ठेवण्यात आली होती. परंतु पहिला डोस घेण्यासाठी गुरुवारी (दि. ६) नागरिकांनी गर्दी केली होती. पहिला डोस व दुसरा डोस असे दोन्ही एकत्र असल्याने आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात येऊन लसीकरण करण्यात आले. मात्र, लस कमी असल्याने अनेकांना लस न घेता परतावे लागले.
सध्या कोविड लस घेण्यासाठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन ही गर्दी रोखण्यासाठी रजिस्ट्रेशन टेबलाची संख्या वाढवण्यात यावी, पहिला डोस व दुसरा डोस असा स्वतंत्र विभाग करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.