तोडलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी मांडला ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 08:58 PM2021-11-28T20:58:55+5:302021-11-28T20:59:28+5:30
वेळुंजे : तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील कास भागात शनिवारी (दि. २७) रोजी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैध तोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तस्करी होत असलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.
वेळुंजे : तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील कास भागात शनिवारी (दि. २७) रोजी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैध तोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तस्करी होत असलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.
हरसूल भागातील ठाणापाडा परिसरातील वनविकास महामंडळाच्या बोरीपाडा रेंजमधील कास येथील पावंधी कार्यक्षेत्रात शनिवारी (दि.२७) खैराच्या सात झाडांची तोड करण्यात आली आहे. त्यापैकी चार झाडे तोडून टाकण्यात आली आहेत तर तीन झाडे अर्धवट धोकादायक स्थितीत उभी आहेत. मात्र जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन दोषींवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत ग्रामस्थांनी तस्करी होत असलेल्या झाडाजवळ ठिय्या मांडला आहे. यामुळे वनविकास महामंडळाची पूर्णतः धावपळ उडाली आहे. हरसूलसारख्या भागांत वनविकास महामंडळामार्फत अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र कुंपणच शेत खात असल्याचे सांगत काससारख्या दुर्गम भागात अनेक वृक्षांना संबंधित विभागच कुऱ्हाड लावून सर्रास तोड करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेला चोवीस तास उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी यादव पवार, जयवंत राऊत, पुंडलिक महाले, काळू वड, मधुकर महाले, नामदेव भुसारे, तुकाराम मोंढे, जाणू वड, रामदास चौधरी, तुळशीराम राऊत, रामदास पवार, देवराम अवतार, विष्णू शेंगे, राजू गोतरणे, भगवान बुधर, सखाराम बुधर, वनपाल अर्जुन किरकिरे, श्रीमती एम.आर. साळुंखे, वनरक्षक एन.एस. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
खैर जातीच्या वृक्षांची तोड ही वनविकास महामंडळाकडूनच करण्यात आली आहे. मात्र त्यात कोण दोषी आहे, त्यासाठी वरिष्ठांची घटनास्थळी भेट महत्त्वाची असून दोन दिवसांपासून जवळपास २०० हून अधिक तस्करीच्या झाडांजवळ ग्रामस्थांनी ठिय्या दिला आहे. मात्र चोवीस तास उलटूनही अद्याप वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत.
- यादव पवार, ग्रामस्थ, कास
वनविकास महामंडळाने केलेली वृक्षतोड लाजिरवाणी बाब आहे. वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन त्याबरोबरच त्याचे संरक्षण करण्याची त्यांची जबाबदारी आहे. मात्र खैर जातीच्या सात झाडांच्या वृक्षतोडीने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- अर्जुन किरकिरे, वनपाल, वनविकास महामंडळ
फोटो- २८ हरसूल फॉरेस्ट
कास परिसरात खैर जातीच्या वृक्षाजवळ ग्रामस्थांनी दिलेला ठिय्या.