साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 08:34 PM2021-02-20T20:34:38+5:302021-02-21T01:17:47+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
वटकपाडा (ता.त्र्यंबकेश्वर) येथे मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम सुरू आहे. खोदलेल्या मुख्य बांधावर सध्या माती टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले आहे. गेल्या रविवारी (दि.१४) येथील ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या कामाची पाहणी केली असता मुख्य बांधाच्या भरावात काळी मातीऐवजी मुरूम मातीचा थर देण्यात येत असल्याची बाब काही जाणकार ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त होत त्यांनी सदर काम बंद पाडले. ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने कोट्यवधी रुपयांच्या कामाला घरघर लागली आहे.
साठवण तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना उकृष्ट कामाच्याबाबत सूचना केल्या होत्या, मात्र त्या सूचनांचे अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून पालन न होता केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
वटकपाडा येथे कोट्यवधी रुपयांचे साठवण तलावाचे काम सुरू असून, केवळ ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे साठवण तलावाच्या मुख्य बांधातून मुरूममातीच्या थरातून पाणी झिरपेल हे सांगता येत नाही. ग्रामस्थांनी हे काम तूर्तास बंद केले आहे.
- गोपाळ गभाले, ग्रामस्थ, वटकपाडा
साठवण तलावाच्या माध्यमातून १२० हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे सदरचे काम योग्यरीत्या ठेकेदारांकडून करून घेणार आहोत. ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दोन दिवसांपूर्वीच याबाबत ठेकेदारास सूचित करण्यात आले आहे. मुख्य बांधात माती परीक्षणानुसार पुरेपूर काळ्या मातीचा भर देण्यात येईल.
- राजेंद्र धूम, उपकार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण
वर्षानुवर्षे येथील ग्रामस्थांचा रोजंदारीसाठी संघर्ष सुरू आहे. यामुळे येथील ग्रामस्थांसाठी पाणी महत्वाचा घटक आहे. या साठवण तलावाच्या माध्यमातून शेती, पाणीटंचाईवर मात होणार आहे. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. तसेच पुढील कामातही कमकुवतपणा वाटल्यास ठेकेदारांवर कारवाई करण्यास भाग पाडणार आहे.
- हिरामण खोसकर, आमदार.