ओढ्याच्या ग्रामस्थांना फेसातून काढावा लागतो मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:58+5:302021-06-06T04:11:58+5:30
एकलहरे : येथील गोदावरी नदीत महिनोंमहिने साचलेल्या पानवेली व त्याखालील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांची झोप ...
एकलहरे : येथील गोदावरी नदीत महिनोंमहिने साचलेल्या पानवेली व त्याखालील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. पाणवेलींखाली साचलेले फेसाळयुक्त पाणी येथील वीज केंद्राच्या बंधाऱ्यातून पुढे प्रवाहित होऊन ओढा गावाजवळून वाहत असून, या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांना फेसातून मार्गक्रमण करावे लागत आहे.
महापालिका क्षेत्रातील सांडपाणी व कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी वाहत असल्याने त्याचा फेस नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळतो. हाच फेस ओढा गावाजवळ साचून मोठा ढीग तयार झाल्याने परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, वाहनधारकांना या फेसातून मार्गक्रमण करावे लागते. पहाटेच्या वेळी हा फेस मुबलक प्रमाणात असतो; मात्र दिवस उजाडताच हळूहळू कमी होऊ लागतो. हा फेस रसायनमिश्रित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका व वीज निर्मिती केंद्राच्या प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. गोदावरीच्या दोन्ही तीरावरील नांदूर, मानूर, गंगावाडी, एकलहरेगाव, शिलापूर, ओढा या सर्वच गावांतील ग्रामस्थांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
कोट===
एकलहरेगाव व गंगावाडी जवळ गोदावरीत मोठ्या प्रमाणात पानवेली साचल्याने डासांची निर्मिती होते. त्यामुळे परिसरात रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे. पानवेलींवर चुकून एखादे पशुधन गेले तर रुतून बसते व निघता येत नसल्याने गतप्राण होते. वीज केंद्र, महापालिका, जिल्हाधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार केला; मात्र दखल घेतली जात नाही.
-राजाराम धनवटे- माजी सरपंच, एकलहरे
(फोटो ०५ फेस)