येवल्यात लाच स्वीकारताना ग्रामसेवक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:40 AM2019-09-05T00:40:57+5:302019-09-05T00:44:28+5:30
येवला : रहिवासी दाखल्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.४) सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. जनार्दन कचरू वाघ (५२) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : रहिवासी दाखल्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.४) सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. जनार्दन कचरू वाघ (५२) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदारास त्याच्या मुलाचा सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारा ग्रामसेवक यांचा नागडे गाव येथील रहिवासी दाखला देण्यासाठी तसेच तहसील व प्रांत कार्यालय, येवला येथून जातप्रमाणपत्र व डोमेसाइल प्रमाणपत्र त्वरित काढून देण्यासाठी वाघने वीस हजारांची लाच मागितली होती; मात्र तडजोडीअंती १५ हजार रुपये घेण्याचे ठरले होते. ती रक्कम तक्रारदाराकडून येवला येथील बसस्थानकाजवळील एका चहाच्या टपरीत स्वीकारताना वाघ जाळ्यात अडकला.
याप्रकरणी नाशिक येथील तपासी अधिकारी विजय जाधव, प्रकाश डोंगरे, श्याम पाटील, प्रवीण महाजन, चंद्रशेखर मोरे, संतोष गांगुर्डे आदी तपास करीत आहेत.