पाण्यासाठी एकवटले अवघे गाव !
By Admin | Published: June 19, 2016 11:05 PM2016-06-19T23:05:48+5:302016-06-19T23:06:23+5:30
मजले चिंचोली पॅटर्न : मंदिर जीर्णोद्धाराची रक्कम जलसंधारणासाठी; व्हॉट््सअॅपवर दिल्या जातात बातम्या
सुदीप गुजराथी नाशिक
‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिंचोली या छोट्याशा गावात सध्या येत आहे. गावाचा पाणीप्रश्न सुटावा, या उद्देशाने अवघे गाव एकवटले असून, लोकवर्गणीतून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. एवढेच नव्हे, गावातील वीरभद्र मंदिराच्या जीर्णोद्धाराची रक्कमही या कामासाठी वापरली जात असून, हा मौजे मजले चिंचोली पॅटर्न राज्यभरात अनुकरणीय ठरत आहे.
अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील व शनि शिंगणापूरपासून वीस किलोमीटरवर असलेल्या मजले चिंचोली या गावाची ही चित्तरकथा आहे. अवघ्या सोळाशे लोकसंख्येचे हे गाव अनेक आगळ्या उपक्रमांमुळे चर्चेत आले आहे. जलसंधारण योजनेसाठी संपूर्ण गाव एकत्र आल्याचे दुर्मीळ चित्र तेथे दिसत आहे. त्याची सुरुवात निवृत्त पोलीस अधिकारी डी. वाय. आव्हाड यांच्या सूचनेतून झाली. राज्यभरात शासनाच्या निधीतून जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू असताना, शासनाच्या मदतीची वाट न पाहता ही कामे लोकसहभागातून करण्याची सूचना त्यांनी ग्रामसभेत केली. गावाच्या सरपंच गीतांजली आव्हाड व उपसरपंच धर्मनाथ आव्हाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. तेथून या कामासाठी निधी जमवण्याची धडपड सुरू झाली आणि मजले चिंचोली जलजागृती अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गीतांजली आव्हाड या गावाच्या पहिल्या महिला सरपंच असून, त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पती अविनाश आव्हाड यांच्या साथीने कसोशीने प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान गावातील धनगर समाजबांधवांनी मंदिर उभारणीसाठी दोन लाख रुपये जमवले होते, तर वीरभद्र मंदिराच्या दानपेटीत बांधकामासाठी चार लाख ८४ हजार रुपये जमा झाले होते. डॉ. योगेश कर्डिले यांच्या प्रयत्नांतून हे सारे पैसे गावाच्या जलजागृती अभियानासाठी देण्यात आले. देवाच्या कामासाठी जमवलेले पैसे सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याचा पायंडाही यानिमित्ताने पडला.
आर्ट आॅफ लिव्हिंगचे विजय हाके, अशोका बिल्डकॉनच्या सहकार्यातून गेल्या १० मे रोजी दोन पोकलेन, जेसीबी, डम्पर व ग्रामस्थांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने अभियानाला प्रारंभ झाला. गेल्या महिनाभरात गावातील वाघोडा नाला, गायमुख तलाव, वीरभद्र तलाव व पिंपळदरा तलावात तब्बल ३३ हजार चौरस मीटर खोदकाम करून खोली वाढवण्यात आली.