विंचूरला दोन दिवसांपासून संततधार
By admin | Published: August 4, 2016 12:39 AM2016-08-04T00:39:29+5:302016-08-04T00:42:32+5:30
विंचूरला दोन दिवसांपासून संततधार
विंचूर : येथे सोमवारी रात्रीपासून हलक्या स्वरूपात पावसाला सुरु वात झाली. नंतर वाढत जाऊन काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळून आजही रिमझिम सुरूच होती. येथील पर्जन्यमापक यंत्रावर ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे दिवसभर येथील तीनपाटीवर व मुख्य बाजारपेठेत बंदसदृश स्थिती होती, तर गावात शुकशुकाट दिसून येत होता. कामानिमित्त परगावी गेलेल्या येथील नागरिकांना घरी परतण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. तसेच येथे मोठ्या प्रमाणात धाब्याची घरे असल्याने या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे गळू लागली. त्यामुळे अनेक कुटुंबांना एका कोपऱ्यात बसून संपूर्ण दिवस काढावा लागला. तरी पावसाच्या पाण्याप्रमाणे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या दमदार पावसामुळे चालू वर्षात प्रथमच लोणगंगा नदीला पूर आला. पूर बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. प्लॅस्टिकच्या कागदांना व छत्र्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली. गेल्या दोन-तीन वर्षाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दमदार पावसाच्या हजेरीने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)