विंचूरला लसीकरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:07+5:302021-06-01T04:11:07+5:30
विंचूर : येथे गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरण मोहीम ठप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमारे पंधरा हजारांवर लोकसंख्या, ...
विंचूर : येथे गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरण मोहीम ठप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमारे पंधरा हजारांवर लोकसंख्या, परिसरातील वाड्यावस्त्या अन् उपबाजार आवारात कायम असणारी वर्दळ यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असतानाही अनेक दिवसांपासून येथे लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
निफाड तालुक्यात कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून चर्चेत असणाऱ्या टॉप फाईव्ह गावांमध्ये विंचूरचा समावेश होता. असे असतानाही नागरिकांना लसीकरणासाठी बाहेरगावी जावे लागत होते;मात्र लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांनी पाठपुरावा केला असता येथील कर्मवीर विद्यालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. त्यातही आठवड्यात एकदा फक्त शंभर ते दीडशे लससाठा आणि त्यातही सातत्य नसल्याने लसीकरण प्रक्रिया सुरळीत चालली नाही. अद्यापही हजारो नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा येथे मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत असून, लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लसीकरण तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. काल निफाड तालुक्यासाठी ५३० डोस मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली; मात्र लसींची संख्या बघता तालुक्याच्या मानाने पुरवठा खूपच कमी असल्याने लसीकरण प्रक्रिया सर्व ठिकाणी राबवणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निमगाव वाकडा आरोग्य केंद्राच्या अन्य उपकेंद्रात लसीकरण बाकी होते अशा ठिकाणी लसीकरण सुरु आहे. दिवसाला शंभर-दीडशेच डोस येत असल्याने आरोग्य विभागही हतबल आहे.
-----------
लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
विंचूर पंचक्रोशीतील केंद्रस्थानी गाव असल्याने येथे मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी येत असतात. तसेच येथे लासलगाव बाजार समितीचा उपबाजार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह इतर तालुक्यातील शेतकरीही आपला शेतमाल विक्रीसाठी विंचूरला प्राधान्य देतात. त्यामुळे विंचूरसारख्या मोठ्या व कायम वर्दळीच्या गावात लसीकरण प्रक्रिया सातत्याने व मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असताना येथे साठा उपलब्ध होत नसल्याचे कारण देऊन लसीकरण अनेक दिवसांपासून ठप्प आहे.
सध्या येथे बोटांवर मोजण्याइतकी रुग्णसंख्या असताना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर लसीकरणाअभावी रुग्णसंख्या पुन्हा मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेशन दुकानदार यासह जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.