उकड्यामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:13 AM2019-12-30T00:13:29+5:302019-12-30T00:13:47+5:30
डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पाटोदा : डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने द्राक्षबागांवर विविध रोगांनी थैमान घातले आहे. पहिला रोग आटोक्यात येण्याच्या वेळेस दुसरा रोग दारात उभा राहत असल्याने द्राक्षबागांवर बुरशीनाशके व औषध फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे ग्रहण लागले आहे. संकटाचे ग्रहण सुटण्याची शक्यता कमी झाली आहे.
अवकाळी पावसामुळे येवला तालुक्यातील निम्म्याहून जास्त द्राक्षबागांना यावर्षी फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांनी द्राक्षबागांसाठी एकरी चार ते पाच लाख रुपयांपर्यंत केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ज्या काही थोड्याफार द्राक्षबागा वाचल्या होत्या त्या बागांना वातावरणातील बदलामुळे विविध रोगांना सामोरे जावे लागत आहे.
औषध फवारणीचा परिणाम
गेल्या काही दिवसांपासून परिसरात पहाटे धुके, सकाळी दव व दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी, घडकूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने या रोगांपासून बागा वाचविण्यासाठी शेतकरीवर्गाने द्राक्षबागांवर बुरशीनाशक व महागड्या औषधांची फवारणी केली. वातावरणातील सततचा होत असलेला बदल व या जास्तीच्या औषध फवारणीचा द्राक्षमण्यांवर परिणाम झाला असून, द्राक्षघडातील निम्म्यापेक्षा जास्त मणी उकड्याला बळी पडले आहेत. उकड्याने द्राक्षमणी हे नरम होऊन खराब होत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून,त्याला हुडहुडी भरली आहे.
सतत बदलते वातावरण, थंडी, धुके, दव व पावसामुळे औषध फवारणी वाढली. वातावरण व औषध फवारणीचा ताळमेळ न बसल्याने उकड्याचे प्रमाण वाढले आहे. या उकड्याने शेतकºयांना लाखो रु पयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.
- लक्ष्मण शेळके,
द्राक्ष उत्पादक, ठाणगाव