द्राक्षबाग तोडून घेतली भाजीपाला शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:53 PM2020-06-18T17:53:13+5:302020-06-18T17:53:44+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुका शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. योग्य मेहनत करूनही गेलेल्या द्राक्ष हंगामात शेतकरीवर्गाला कोणताच हमी भाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला अग्रक्रम दिला आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुका शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. योग्य मेहनत करूनही गेलेल्या द्राक्ष हंगामात शेतकरीवर्गाला कोणताच हमी भाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला अग्रक्रम दिला आहे.
तालुक्यातील छोटेसे खतवड हे द्राक्ष पिकविण्यासाठी एक आदर्श गाव, परंतु दिवसेंदिवस द्राक्ष शेती करणे फार अवघड होत चालले आहे. महागड्या औषधांचा वापर करून द्राक्ष पीक घेतले जाते. जेवढे उत्पन्न त्यातले ३० ते ३५ टक्के भांडवल अगोदर खर्च करावे लागते. नंतर हातात पैसा हे गणित द्राक्षे हंगामाचे राहते. त्यामुळे खूप मेहनत, भरपूर भांडवल, मनुष्य बळ हे सर्व करूनही घेतलेल्या पिकाला योग्य दर मिळत नाही, म्हणून शेतकरीवर्ग नाराज होत चालला आहे.
या संकटांना न घाबरता गोकुळ महाराज खुर्दळ यांनी नवीन प्रयोग करीत एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून, त्याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचा प्रयोग करून भाजीपाला शेती करीत कमी दराच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आहे.
गोकुळ महाराज खुर्दळ हे सध्या देहू येथे वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून, संत सावता महाराज यांच्या ‘कांदा, मुळा, भाजी... अवघी विठाई माझी’ या अंभगाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या शेतात द्राक्ष पिकांची झाडे काढून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीचा वापर करीत भाजीपाला शेती करण्यास सुरु वात केली आहे. भाजीपाला शेती चांगली येत असल्याने आणि योग्य दर मिळण्यास चांगली मदत होत आहे.
मागील तीन वर्षांपासून आम्हाला द्राक्ष पिकाला खूप मेहनत करूनही योग्य दर मिळत नव्हता. कर्ज मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही शेतीमध्ये बदल करण्याचे ठरविले व द्राक्षबागा तोडून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीची भाजीपाला शेती सुरू केली, आम्हाला त्यामध्ये यश मिळत आहे.
- गोकुळ महाराज खुर्दळ (खतवड)