फिरत्या भाजीविक्रेत्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:35+5:302021-04-20T04:14:35+5:30
नाशिक : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालून दिल्यामुळे भाजी घेण्यासाठी नागरिकांना बाजारात जाता येत नाही. मात्र, जे फिरते भाजी विक्रेते ...
नाशिक : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालून दिल्यामुळे भाजी घेण्यासाठी नागरिकांना बाजारात जाता येत नाही. मात्र, जे फिरते भाजी विक्रेते हातगाडीवर व्यवसाय करण्यासाठी फिरतात त्यांच्याकडून कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नाशिक शहरातील पाथर्डी फाटा, अंबड, सिडको, कामटवाडे, चुचाळे, सातपूर, इंदिरानगर भाग हा कामगार वस्ती म्हणून ओळखला जातो. अनेक कामगार कुठल्या ना कुठल्या रोजगाराच्या शोधात असतात. कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यात अनेक भाजी विक्रेत्यांनाही व्यवसाय करणे अवघड झाले आहे. काही व्यावसायिक प्रामाणिकपणे व्यवसाय करतात तर काही बेशिस्त व्यावसायिकांमुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. सिडको, अंबड, चुंचाळे, सातपूर भागात गल्लोगल्ली फिरणारे आणि हातगाडीवर भाजी विकणारे व्यावसायिक नियमांचे पालन करीत नसल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. मास्क न घालणे, रस्त्यावर थुंकणे अशा प्रकारांमुळे कळत नकळत कोरोना आजाराला आमंत्रण दिले जात आहे. यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. अशा व्यावसायिकांना फिरू देऊ नये किंवा यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. सध्या शहरातील विविध भागात काेराेनाचे नियम धाब्यावर बसवून मास्क न लावताच भाजी विकणारे असे अनेकजण नजरेस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.