होम क्वारण्टाइन केलेल्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 09:44 PM2020-05-24T21:44:00+5:302020-05-24T21:45:33+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून देवळा तालुक्यात वैध-अवैध मार्गांनी आलेल्या व होम क्वॉरण्टाइन केलेल्या अनेक व्यक्तींचा गावागावांत मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवळा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून देवळा तालुक्यात वैध-अवैध मार्गांनी आलेल्या व होम क्वॉरण्टाइन केलेल्या अनेक व्यक्तींचा गावागावांत मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवळा तालुक्यालगत असलेल्या चांदवड, सटाणा, कळवण, मालेगाव या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण सापडले असले तरी सुदैवाने अद्याप देवळा तालुका कोरोनामुक्त आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्यानंतर देवळा तालुक्यात पुणे, मुंबई, नाशिक, मालेगाव आदी प्रतिबंधित क्षेत्रांतून अनेक नागरिक आले आहेत.
यापैकी काही नागरिक आपल्या मूळ गावी न जाता इतर गावात नातेवाइकांकडे थांबले आहेत. यामुळे काही गावात वादविवाद झाले आहेत. आरोग्य विभागाने या नागरिकांना १४ दिवस होम क्वॉरण्टाइन राहण्याच्या सूचना दिल्या असून, तसे राहणे बंधनकारक आहे. परंतु काही अपवाद सोडले तर इतर महाभाग सूचनांचे पालन न करता गावात फिरताना दिसत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या नागरिकांबाबत कठोर भूमिका घेण्यात स्थानिक प्रशासन कमी पडल्याचे चित्र आहे. गावातील राजकारण, भाऊबंदकी, हितसंबंध जोपासण्यास प्राधान्यक्रम यामुळे कठोर पाऊल उचलली जात नसल्याची चर्चा आहे.
अकरा जणांचे अहवाल प्रलंबित
१८ मे रोजी मुंबईस्थित एका महिलेचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिला देवळा तालुक्यातील मेशी येथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आली होती. या महिलेच्या संपर्कातील अकरा जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. आजच्या घडीला कोरोना तालुक्याच्या उंबरठ्यावर आला आहे. असे असताना बाहेरगावांहून आलेले काही बेजबाबदार नागरिक ग्रामपंचायतीने सूचना देऊनही कुठलीही सुरक्षासाधने न वापरता गावभर फिरताना दिसून येत आहेत.