‘समृद्धी’च्या मोजणीला हिंसक वळण
By admin | Published: April 8, 2017 12:17 AM2017-04-08T00:17:06+5:302017-04-08T00:17:18+5:30
सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला.
सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. मोजणी करू न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम होते तर अधिकारी मोजणी केल्याशिवाय माघारी जाण्याच्या मन:स्थितीत नसल्याने घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून आपला विरोध दर्शविला. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत झालेली बाचाबाची व किरकोळ दगडफेक यामुळे मोजणीला हिंसक वळण प्राप्त झाल्याचे चित्र होते.
प्रस्तावित नागपूर-मुंबई मार्गाच्या संयुक्त मोजणीला प्रारंभ करण्यात आला आहे. या मोजणीला गावोगावी शेतकरी विरोध दर्शवित आहेत. शुक्रवारी शेतकरी आक्रमक झाल्याचे शिवडे येथील मोजणीप्रसंगी दिसून आले. मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना शिवारातच येवू द्यायचे नाही असा निर्णय शिवडे येथील शेतकऱ्यांनी घेतला होता. सकाळपासून शिवडे-पांढुर्ली रस्त्यावर शेकडो शेतकरी व महिला ठाण मांडून बसले होते. मात्र मोजणीसाठी आलेल्या पथकाने पोलीस बळाचा वापर करीत शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढत सायंकाळपर्यंत मोजणी केली.
गुरुवारी सोनांबे येथे शेतकऱ्यांचा विरोध झुगारुन मोजणी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोजणी पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा घेवून सावतामाळीनगर येथे दाखल झाले. पोलीस बंदोबस्तात येथे शेतजमिनीची मोजणी करण्यात आली. याची खबर शिवडे येथील शेतकऱ्यांनी होती. त्यामुळे शेतकरी अगोदरपासूनच विरोध करण्यासाठी तयारीत होते.
शेकडो शेतकरी शिवडे-पांढुर्ली रस्त्यावर टायर पेटवून आपला विरोध दर्शवित असल्याची खबर मोजणी पथकाला होती. त्यामुळे चर्चेसाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना आमंत्रण पाठविण्यात आले. मात्र शेतकरी मोजणी करु न देण्याच्या भूमिकेवर ठाम होते.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्यासह संयुक्त मोजणी अधिकाऱ्यांचे पथक अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे, तृप्ती आठवले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा लवाजमा व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या घेवून शिवडे गावाकडे रवाना झाले. या ताफ्यात दोन अग्निशामक बंब, रुग्णवाहिका व क्रेन होते.
पांढुर्ली-शिवडे रस्त्यावर शेकडो शेतकरी रस्त्यावर टायर पेटवून आंदोलनाच्या तयारीत होते. संयुक्त मोजणीचा ताफा शिवडे शिवारात आल्यानंतर शेतकऱ्यांनी मोजणी न करता माघारी जाण्याची विनंती केली. मात्र मोजणी करण्याच्या भूमिकेवर अधिकारी ठाम असल्याने शाब्दीक चकमक झाली. चर्चेतून मार्ग निघत नसल्याने शेतकऱ्यांना बाजूला जाण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर वातावरणत चिघळण्यास प्रारंभ झाला. पोलीस कर्मचारी व शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आंदोलनकर्त्यांना घेराव घालण्यास प्रारंभ केला. त्यामुळे उपस्थित शेतकरी सैरभैर होण्यास प्रारंभ झाला. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेवून पोलीस वाहनात बसविण्यास प्रारंभ केल्यानंतर प्रंचड गोंधळ निर्माण होवून किरकोळ दगडफेक झाली. शेतकरी संघर्ष समितीचे राजू देसले, रावसाहेब हारक यांच्यासह काही शेतकऱ्यांसोबत प्रांताधिकारी महेश पाटील यांनी चर्चा केली. एकीकडे चर्चा सुरु असतांना दुसरीकडे अधिकाऱ्यांनी मोजणीस प्रारंभ केला होता. मोजणी सुरु असल्याचे महिलांच्या लक्षात येताच त्यांनी मोजणीस्थळी जावून पुन्हा प्रखर विरोध करण्यास प्रारंभ केला.(वार्ताहर)