आंदोलनाला हिंसक वळण
By admin | Published: June 6, 2017 02:24 AM2017-06-06T02:24:15+5:302017-06-06T02:24:25+5:30
सटाणा : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला बागलाण तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात शंभर टक्के कडकडीत बंद पाळून प्रतिसाद देण्यात आला. सटाणा शहरात मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर लखमापूर, जुनी शेमळी व धांद्री येथे सटाणा-मालेगाव मार्ग अडवून दीड तास चक्का जाम केला. धांद्री येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला प्रवेशद्वारावर फाशी देण्यात आली. लखमापूर येथे शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केल्यामुळे सटाणा-मालेगाव रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.गेल्या चार दिवसांत ठिकठिकाणी झालेले रास्ता रोको आंदोलन व आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे संपाची तीव्रता वाढत आहे. मांगीतुंगी फाटा, सोमपूर, आसखेडा, नामपूर, मुंगसे, वीरगाव येथे भाजीपाला वाहतुकीचे मालट्रक अडवून तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. दरम्यान, सोमवारी (दि. ५) राष्ट्रवादी कॉँग्रेससह काही शेतकरी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला बागलाण तालुक्यातील नामपूर, द्याने, उत्राणे, आसखेडा, जायखेडा, सोमपूर, ताहाराबाद, मुल्हेर, डांगसौंदाणे, करंजाड, निताणे, वीरगाव, कंधाणे, चौंधाणे, मुंजवाड, आराई, मोरेनगर, अजमीर सौंदाणे, वायगाव, लखमापूर, ब्राह्मणगाव, धांद्री, जुनी शेमळी आदी ठिकाणी शंभर टक्के प्रतिसाद लाभला. सटाणा शहरात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच बाजारपेठ काही प्रमाणात सुरू होत्या, तर प्रवासी वाहतूकदेखील सुरळीत होती. सटाणा बाजार समितीतही सोमवारी व्यवहार बंद ठेवल्याने आवारात शुकशुकाट होता. साठफुटी रोडवरील डेली भाजीपाला मार्केट व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला.
बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहर व परिसरात बंदोबस्तात वाढ केली होती. बंद काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी विशेष गस्ती पथके तयार केली असून, ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.