‘चिंतामणी’ पावला! व्हीआयपी दर्शन बंद; नाशिकच्या भाविकाच्या प्रयत्नांना यश
By संजय पाठक | Published: February 6, 2024 06:40 PM2024-02-06T18:40:55+5:302024-02-06T18:41:13+5:30
अन्य देवस्थानांनी निर्णय घेण्याची गरज
नाशिक- देवासमोर सर्व समान आहेत असे म्हटले जात असले तरी महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये सशुल्क व्हीआयपी दर्शनाची सुविधा असते.
त्यामुळे देवासमोरच भेदाभेद होतो. अष्टविनायकातील चिंतामणी मंदिरात अशाप्रकारच्या व्हीआयपी दर्शनाला नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांनी आक्षेप घेतला आणि तशी कायदेशीर नोटीस देखील बजावली. त्यांच्या नोटिसीनंतर चिंचवड ट्रस्टने तातडीची बैठक घेतली आणि आर्थिक निकषावर भाविकांमध्ये भेद न करण्याचा निर्णय घेतला, तसेच शंभर रुपये शुल्क आकारणी करून व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
चिंतामणी ट्रस्टचे वकील मनोज वाडेकर यांनी यासंदर्भात दळवी यांचे वकील मनोज पिंगळे यांना पत्र दिले आहे. गेल्या १ जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने नाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे सदस्य असलेले माजी सरपंच कैलास दळवी हे अष्टविनायक दर्शनासाठी निघाले. त्यानंतर थेऊर येथील चिंतामणी येथे शंभर रुपयांत सशुल्क दर्शन म्हणजेच व्हीआयपी दर्शनाचा त्यांनी फलक बघितला. एकीकडे भाविक दर्शनासाठी रांगेत तासंतास उभे असताना दुसरीकडे मात्र शंभर रुपये आकारून दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आल्याने दळवी
यांनी त्यास आक्षेप घेतला होता आणि नंतर वकिलामार्फत नोटीस बजावली होती.