८४४४४४४४४४ या व्हीआयपी क्रमांकाची भुरळ; माजी मंत्री घोलप यांना लाख रुपयांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:21 PM2018-03-05T17:21:44+5:302018-03-05T17:21:44+5:30
व्हीआयपी क्रमांक खरेदी केल्यास आयफोन मोफत देण्याचे आमिषही दाखविले. यानंतर घोलप यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये भरले; मात्र टप्प्याटप्याने वस्तूची डिलिव्हरी देण्याच्या निमित्ताने वेळोवेळी पैसे उकळले. तब्बल १ लाख ३३ हजार रुपये त्यांच्याकडून नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आले.
नाशिक : माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांना व्हीआयपी सिमकार्ड क्रमांक व आयफोनचे आमिष दाखवून तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असला तरी अद्याप भामट्याचा तपास लागू शकलेला नाही.
नाशिकमधील देवळालीगाव परिसरात वास्तव्यास असलेले घोलप यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आलेल्या लघुसंदेश वाचून त्यांनी संपर्क साधत भामट्याने व्हीआयपी सिमकार्डबाबत माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला.८४४४४४४४४४ या व्हीआयपी क्रमांकाची भुरळ घोलप यांना घालून त्याने वेळोवेळी पैसे उकळले. व्हीआयपी क्रमांक खरेदी केल्यास आयफोन मोफत देण्याचे आमिषही दाखविले. यानंतर घोलप यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये भरले; मात्र टप्प्याटप्याने वस्तूची डिलिव्हरी देण्याच्या निमित्ताने वेळोवेळी पैसे उकळले. तब्बल १ लाख ३३ हजार रुपये त्यांच्याकडून नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आले; मात्र त्यानंतर संपूर्ण पैसे भरूनही कुठल्याही प्रकारे वस्तू व सेवा पुरविली नसल्याचे लक्षात आल्यानंतर भामट्यांनी फसवणूक केल्याची घोलप यांना खात्री पटली व त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. तसेच १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वेळोवेळी भारतीय एअरटेल एन्टरप्रायजेस तलवाररोड शाखा, जयपूर, संतोष राठोड कोटक महिंद्र शाखा जयपूर या नावाने असलेल्या बॅँक खात्यामध्ये घोलप यांनी रक्कम जमा केली. सुरुवातीला तीस हजार रुपये एन्टरप्रायजेस खात्यावर त्यांनी जमा केले त्यानंतर राठोड नावाच्या भामट्याच्या खात्यावर घोलप यांनी दोन वेळा व्यवहार करत ५४ हजार व २९ हजार १२६ रुपये जमा केल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घोलप यांनी रविवारी नाशिकरोड पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज दिला असून त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक गायकवाड करीत आहेत.
--इन्फो--
भ्रमणध्वनी क्रमांक स्विच आॅफ
घोलप यांना ज्या क्रमांकावरून लघुसंदेश धाडला गेला व वेळोवेळी त्यांच्यासोबत मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. अशी सर्व भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी घोलप यांनी तक्रार अर्जात नमुद केली आहे; मात्र यापैकी एकही भ्रमणध्वनी क्रमांक सुरू नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यात संशयित भामट्यांनी जरी मोबाईलचा वापर करत फसवणूक केली असली तरी नाशिकरोड पोलीस ठाण्यात केवळ फसवणूकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल असून सायबर गुन्ह्याची कुठलेही कलम नोंदविण्यात आलेले नाही हे विशेष!