बंदीजणांच्या पाल्यांचा गुणगौरव
By admin | Published: August 29, 2016 12:54 AM2016-08-29T00:54:50+5:302016-08-29T00:56:46+5:30
बंदीजणांच्या पाल्यांचा गुणगौरव
नाशिकरोड : कैद्यांच्या मुलांकडे समाजात कुत्सित नजरेने पाहिले जाते. त्यांच्या मुलांना प्रतिष्ठेने जगता यावे, जगण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, कैद्यांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित केलेला कैदी व कारागृह कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिखर प्रतिष्ठान, रेणुका औद्योगिक संस्थेच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या कैदी व कारागृह कर्मचारी गुणवंत पाल्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी बोलताना सानप म्हणाले की, उपक्रमांमुळे बंदीजनांच्या मुलांनाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अशा अभिनव उपक्रमांना माझ्या आमदार निधीतून मदत देण्यास मी कटिबद्ध आहे. बंदीजनांच्या पाल्यांनी उच्च शिक्षणाद्वारे स्वत:ची उन्नती साधून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन सानप यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष मंदाबाई फड, नगरसेविका संगीता गायकवाड, शिखर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गायकवाड, नंदू हांडे, कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी वैभव आगे, कैलास भंवर, उपअधीक्षक प्रमोद वाघ, जी. ए. मानकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर व्यापारी बॅँकेचे संचालक हेमंत गायकवाड यांनी बंदीजनांच्या एका मुलीला दत्तक घेण्याचे जाहीर केले. आभार सोमनाथ बोराडे यांनी केले. यावेळी मनीषा शेळके, कांचन चव्हाण, गणेश सातभाई, सोमनाथ बोराडे, आशा पावसे, आरती आहिरे आदिंसह बंदीबांधव, अधिकारी, कर्मचारी व पाल्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)