धुळ्याच्या टेस्टिंग लॅबबाबत संशयाचा व्हायरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:56 AM2020-05-29T00:56:13+5:302020-05-29T00:59:42+5:30
कोरोनामुळे ‘पॉझिटिव्ह’ हा शब्द धक्कादायक बनला असताना हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव येथील रुग्णाच्या एकच स्वाबच्या नमुन्याचा आधी पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्याचा पराक्रम धुळे येथील कोरोना टेस्टिंंग लॅबने केला आहे. लॅबच्या या कारागिरीमुळे सदर रुग्णाला मनस्ताप तर भोगावा लागलाच शिवाय लॅबचा ढिसाळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. एकूणच आजवरच्या रिपोर्टबाबतही या लॅबविषयी संशयाचा व्हायरस घुसला आहे.
नाशिक : कोरोनामुळे ‘पॉझिटिव्ह’ हा शब्द धक्कादायक बनला असताना हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव येथील रुग्णाच्या एकच स्वाबच्या नमुन्याचा आधी पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्याचा पराक्रम धुळे येथील कोरोना टेस्टिंंग लॅबने केला आहे. लॅबच्या या कारागिरीमुळे सदर रुग्णाला मनस्ताप तर भोगावा लागलाच शिवाय लॅबचा ढिसाळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. एकूणच आजवरच्या रिपोर्टबाबतही या लॅबविषयी संशयाचा व्हायरस घुसला आहे.
मालेगाव शहर हे कोरोना संसर्गाबाबत दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले आहे. मालेगावी रुग्णांचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की प्रशासकीय यंत्रणेसह ठाकरे सरकारच्याही काळजाचा ठोका चुकतो. मालेगाव येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने धुळे येथे कोरोना टेस्टिंंग लॅब (आयसीएमआर लॅबोरेटरी- एसबीएचजीएमसी) कार्यान्वित केली, परंतु पावणेदोन तासांच्या फरकाने दोन भिन्न रिपोर्ट देण्याच्या या प्रकाराने लॅबच्या एकूणच यंत्रणेविषयी संशयास्पद वातावरण तयार झाले आहे.
मालेगाव येथील एका व्यक्तीला गुडघ्याच्या शस्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिनांक २६ मे रोजी शस्रक्रियेपूर्वी कोरोना तपासणीसाठी या व्यक्तीच्या घशाचे स्वाब घेण्यात आले आणि ते धुळे येथील टेस्टिंग लॅबकडे पाठविण्यात आले.
दिनांक २७ मे रोजी लॅबने सकाळी ८.३९ वाजता सदर व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह पाठविला. या रिपोर्टमुळे त्या व्यक्तीला प्रचंड मानसिक धक्का तर बसलाच शिवाय रुग्णालयातही धावपळ उडाली. रुग्ण मानसिक तणावात असतांनाच १०.२० वाजता दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह पाठविण्यात आला. दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन गोंधळात पडले. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रुग्णाचा जीव भांड्यात पडला पण पावणे दोन तासांच्या फरकाने आलेल्या या भिन्न रिपोर्टमुळे लॅबचा निष्काळजी कारभार त्यानिमित्ताने उघड झाला.
तपासणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
मालेगाव येथून रोज शेकडो स्वॅबचे नमुने तपासणीसाठी धुळे येथे पाठवले जात आहेत. या नमुन्यांची योग्य तपासणी होते किंवा नाही, याबाबत आता संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. एखादा चुकीचा अहवाल धोकादायक ठरू शकतो. तपासणी यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह लागल्याने कोरोना विषयी आणखी भीती वाढली आहे.