‘व्हिझिट महाराष्ट्र’च्या धर्तीवर ‘व्हिझिट नाशिक’
By admin | Published: August 27, 2016 11:22 PM2016-08-27T23:22:05+5:302016-08-27T23:22:43+5:30
जयकुमार रावल : वॉटरस्पोर्ट्स, वायनरी हबसाठी विशेष निधी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासह अन्य धार्मिक ठिकाणे तसेच प्रेक्षणीय स्थळांचा खजिनाच असलेल्या नाशिक जिल्ह्यात लवकरच राज्य सरकारच्या ‘व्हिझिट महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ‘व्हिझिट नाशिक’चा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे धोरण ठरविले आहे. त्यामुळेच पर्यटन विभागाला स्वतंत्र मंत्री देऊन महाराष्ट्रातील पर्यटन वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी २०१७ हे वर्ष ‘व्हिझिट महाराष्ट्र’ म्हणून साजरे केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने खूपच पोषक वातावरण आहे. म्हणून व्हिझिट महाराष्ट्राच्या धर्तीवर नाशिककडे पर्यटक आकर्षित होण्यासाठी ‘व्हिझिट नाशिक’ची संकल्पना लवकरच राबविण्यात येईल. अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने महाराष्ट्र सरकारनेही पर्यटनाकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक तो निधीही पर्यटनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नाशिकला गड-किल्ले, धरणे, वायनरी, शिर्डी, शनि-शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंग गड यांसारखी धार्मिक स्थळे, तसेच नांदूरमध्यमेश्वर सारखी पक्षी अभयारण्ये, वायनरी प्रकल्प असे पर्यटनाच्या दृष्टीने एक ना अनेक गोष्टी आहेत. नाशिक जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहणार आहेत. गंगापूर डॅमवरील बोटक्लब सुरू करण्याबरोबरच नाशिकमधून वॉटरस्पोर्ट व सी-प्लेन सेवा सुरू करण्याचे प्रयत्न राहणार आहे. दिल्ली हाटबाजाराच्या धर्तीवर नाशिकच्या गोवर्धन येथे कलाग्राम केंद्र सुरू करण्यात येईल. नाशिकची विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सरकार मदत करणार आहे. धार्मिकस्थळांना विमानसेवेद्वारे भेटी देणाऱ्या पर्यटकांना २५०० रुपयांत हवाई सफर घडविण्यात येईल. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आयुक्त एकनाथ डवले, पर्यटन महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)