चरित्रलेखनासाठी विवेक आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:46 AM2018-04-05T00:46:59+5:302018-04-05T00:46:59+5:30
संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे. चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.
नाशिक : संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे.चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. गंगापूररोडवरील कुसुमाग्रज सभागृहात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी लिखित संत मीराबाई या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पठारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विचारवंत रावसाहेब कसबे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सुमती लांडे, डॉ. मनोज चोपडा, डॉ. श्रीपाल शाह, अभिमन्यू सूर्यवंशी, शकुंतला सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पठारे म्हणाले, सूर्यवंशी यांनी वयाची साठी ओलांडल्यानंतर लिखाणाला सुरुवात केली आणि तीदेखील चरित्रलेखन प्रकाराची निवड करत. चरित्रलेखन ही एक अनन्यसाधारण कला त्यांनी जोपासत पोलीस खात्यातून निवृत्तीनंतरचे आयुष्य ते समृध्दपणे जगत आहे. त्यांची ही कला म्हणजे उत्कटतेची बांधलेली एकप्रकारची पूजा होय. विविध संतांच्या चरित्रातील वेगळेपण हे त्या-त्या काळी भावीपिढीला मार्गदर्शक व संस्कार देणारे असते. संतांचे आयुष्य हे अत्यंत कठीण व खडतर असते त्यापैकी एक संत मीराबाई यादेखील आहेत. राजघराण्यात जन्माला येऊनही मीराबाई यांनी जगलेले आयुष्य हे अत्यंत कष्टाचे व तितकेच प्रेरणादायीदेखील आहे. त्यांचे चरित्रलेखन करणे म्हणजे कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. कसबे म्हणाले, की संत मीराबाई म्हणजे प्रेमाचा सागर असून या प्रेमरुपी सागरात जितके डुंबता येईल तितके जीवन सार्थ होईल. मीराबार्इंनी फक्त प्रेम केले. प्रेमामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते. प्रेमाला सौंदर्यात परावर्तीत कसे करावे हे मीराबार्इंकडून शिकण्यासारखे आहे. सूर्यवंशी यांचे मनोगत जयश्री सूर्यवंशी यांनी वाचून दाखवले. प्रास्ताविक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले व सूत्रसंचालन बरंठे आणि जान्हवी देवकर यांनी केले.