युवा सरपंचांची दूरदृष्टी अन् गावकऱ्यांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:38+5:302021-07-02T04:11:38+5:30
दिंडोरी (भगवान गायकवाड) : सरपंचाची दूरदृष्टी अन् त्याला सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी अन् गावकऱ्यांची साथ मिळाली तर ...
दिंडोरी (भगवान गायकवाड)
: सरपंचाची दूरदृष्टी अन् त्याला सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी अन् गावकऱ्यांची साथ मिळाली तर गावाचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिंडोरी तालुक्यातील अवनखेड. अवनखेड गाव स्मार्ट व्हिलेज झालंय व त्यास राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता अभियानाचा प्रथम पुरस्कार मिळाला. हे यश येथील युवा सरपंच नरेंद्र जाधव यांच्या प्रयत्नातून गावाने त्यांच्या व त्यांच्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांच्या वर दाखवलेल्या विश्वासाने व ग्रामसेवक यांच्या साथीने मिळाले आहे. त्यांच्या हाती गावाने कारभार दिल्यावर त्यांनी गावविकासाचा ध्यास घेत गावात विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सरपंच व गावकऱ्यांची गाव विकासाची धडपड पाहता तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गावाची संसद आदर्श ग्राम योजनेत निवड केल्याने विकासाला अधिक गती मिळाली. विद्यमान खासदार भारती पवार यांनीही गावाला साथ दिली. परिसरातील परनोल्ड रिकोर्ड कंपनीने सीएसआर निधी देत गावच्या विकासात मोलाचे योगदान दिले. ग्रामसेवक विनोद आहिरे यांनीही अवनखेडच्या विकासात भूमिका निभावली आहे.
------------------
या आहेत गावात सुविधा
कादवा नदीच्या तीरावर वसलेल्या जेमतेम २८०० लोकसंख्या व ४१४ कुटुंब असलेल्या अवनखेड गावात प्रत्येकाकडे वैयक्तिक शौचालय आहे. अंगणवाडी प्राथमिक शाळा डिजिटल आहे. सर्व दाखले ऑनलाइन पुरवले जातात. गावात वायफाय इंटरनेटची सुविधा, सोलरवर पथदीप, आदिवासी वस्तीत सोलरवर पाणीपुरवठा, भव्य ग्रामपंचायत कार्यालय सभागृह, नदीवर घाट, वैकुंठ रथ आदी विविध सेवा येथे उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळेची इमारत उभी राहत आहे. दलित वस्तीत बुद्धविहाराचे काम सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय आहेच. परंतु ग्रामपंचायत कार्यालयासमोर सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले असून, गावात स्वच्छता राहण्याकामी प्रबोधन करण्यात येऊन घंटागाडीद्वारे कचरा गोळा करून खड्डा तयार करून कचऱ्याचे कंपोस्ट खतनिर्मिती केले. ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.
-----------------------
अवनखेड ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला गावाचा विकास करण्याची संधी दिली. आपण गावात विकासाच्या विविध योजना राबविताना सर्व ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांचे मार्गदर्शन घेतले. ग्रामस्थांनी त्यात सक्रिय भाग घेत साथ दिली. त्यांच्या सहकार्यानेच गाव विकासात घोडदौड करू शकले. खासदार भारती पवार व माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. अजूनही गावात विविध विकासाच्या योजना राबवत आदर्श गाव करण्याचा प्रयत्न आहे.
- नरेंद्र जाधव,
सरपंच, अवनखेड (०१ नरेंद्र जाधव)
010721\01nsk_38_01072021_13.jpg
०१ नरेंद्र जाधव