अनुसूचित आयोगाची जिल्ह्याला भेट
By admin | Published: October 18, 2016 03:12 AM2016-10-18T03:12:11+5:302016-10-18T04:05:43+5:30
पीडित नागरिकांकडे चौकशी : राज्य शासनाला लवकरच अहवाल सादर
नाशिक : तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचारानंतर दगडफेक व हिंसाचार झालेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे, सदस्य सी़ एल़ थूल व आऱडी़ शिंदे यांनी सोमवारी (दि़ १७) भेट देऊन घटनेची चौकशी केली़ आयोगाच्या सदस्यांनी या गावातील दगडफेक करण्यात आलेली घरे, जखमींची भेट घेऊन घटनेची माहिती करून घेतली़ या आयोगाकडून लवकरच राज्य शासनास या घटनेचा अहवाल दिला जाणार आहे़ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवर शनिवारी (दि़ ८) सायंकाळी अत्याचार केल्याची घटना घडली होती़ (पान ५ वर) या घटनेचे तीव्र पडसाद दुसºया दिवशी अर्थात रविवारी (दि़९) उमटले़ नाशिक तालुक्यातील विल्होळी, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांतील अंजनेरी, तळेगाव, शेवगेडांग, सांजेगाव, तळवाडे, वाडीवºहे गोंदे आदि गावांमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता़ तसेच या ठिकाणी काही घरांवर दगडफेक, तर काही ठिकाणी दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या होत्या़ यानंतर संवेदनशील गावांमध्ये लागू केलेली संचारबंदी रविवारी सकाळपासून हटविण्यात आली़ सोमवारी राज्य अनुसूचित जाती - जमाती आयोगाने अध्यक्ष व सदस्य, जिल्हाधिकारी बी़ राधाकृष्णन, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिक प्रांताधिकारी के. मंजूलक्ष्मी, त्र्यंबकचे प्रांत राहुल पाटील, समाजकल्याण विभागाच्या अधिकारी वाजे यांनी पोलिसांनी हिंसक जमावावर गोळीबार केला तो पाडळी फाटा, नांदूरवैद्य, सांजेगाव, तळेगाव येथील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ या तिन्ही गावांमधील नागरिकांकडून घटनेची वास्तवता जाणून घेत शासनाकडून मिळालेल्या मदतीबाबत चौकशी केली़ यानंतर आयोगाने शासकीय विश्रामगृहावर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, अधीक्षक शिंदे यांच्यासमवेत बैठक घेतली़ यावेळी गुन्हे दाखल करण्यात पक्षपात झाल्याची कैफियत मांडण्यात आली. यानंतर आयोगाने उपचार घेत असलेली पीडित मुलगी, दंगलीतील जखमींची भेट घेतली़ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़सुरेश जगदाळे यांनी त्यांना जखमींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली़ आयोगाची चौकशी पूर्ण झाली असून, याचा सविस्तर अहवाल लवकरच शासनास सादर केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)