मालेगावी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:15 AM2021-05-25T04:15:47+5:302021-05-25T04:15:47+5:30
देशातील कोविडची गंभीर परिस्थिती व ऑक्सिजनसह संसाधनांची कमतरता बघता आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूजच्या ...
देशातील कोविडची गंभीर परिस्थिती व ऑक्सिजनसह संसाधनांची कमतरता बघता आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूजच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आदींसह जीवनरक्षक प्रणालींचे मदत म्हणून वाटप करण्यात येत आहे. यासाठी रुग्णालयांची गरज नोंदवून त्या दृष्टीने पुरवठा करण्यात येत आहे. मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाची गरज बघता ५ किलो क्षमतेच्या पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मदत म्हणून रुग्णालयाला हस्तांतरित करण्यात आले आहे. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश महाले, डॉ. योगेश पाटील आदींच्या उपस्थितीत मालेगावच्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे योग प्रशिक्षक योगेश शेलार , संजय सूर्यवंशी , नंदकिशोर कासार, डॉ प्रतीक्षा दायमा, कुणाल शेटे, दीपक शेलार आदी साधकांनी मशीन हस्तांतरित केले. यामुळे येथील सामान्य रुग्णालयात १७ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन झाले आहेत.
कोट-
मालेगावच्या सामान्य रुग्णालयात तीस ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन झाल्यास तिसऱ्या लाटेचा सामना करतांना ऑक्सिजन टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूजकडून मिळालेल्या पाच मशीनमुळे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे.
- डॉ. हितेश महाले, वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय ,मालेगाव
कोट...
आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील रुग्णालयांना जीवनरक्षक संसाधनांची मदत दिली जात आहे. मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला ५ किलो क्षमतेच्या पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात आले आहे. १० किलो क्षमतेच्या मशीनची गरज येथील सामान्य रुग्णालयाकडून नोंदविण्यात आली असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नही करीत आहोत.
- योगेश शेलार, योग प्रशिक्षक , आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार , मालेगाव