‘पुरुषोत्तम’च्या माजी विद्यार्थ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:49 AM2018-12-01T00:49:32+5:302018-12-01T00:49:48+5:30
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील १९६८-६९ च्या माजी विद्यार्थांचा स्नेहमीलनाचा मेळावा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाला. शाळेच्या अनेक आठवणींना यावेळी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.
नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील १९६८-६९ च्या माजी विद्यार्थांचा स्नेहमीलनाचा मेळावा
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाला. शाळेच्या अनेक आठवणींना यावेळी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. सुरु वातीला शाळा भरल्याची घंटा वाजवून प्रतिज्ञा व प्रार्थना झाली. यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिलीप दातीर, अरविंद, राजलक्ष्मी रामन, माधुरी जोशी, नीलिमा गोखले, डॉ. भास्कर पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ या माजी विद्यार्थांनी शाळेच्या संस्कारामुळे आम्ही घडलो, असे सांगून स्वत:ची ओळख शोधण्यास मदत झाली आहे. या शाळेने आत्मविश्वास दिला असून, मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही उत्तम करिअर करता येते याचा अभिमान वाटतो, असे सांगितले.
यावेळी माजी विद्यार्थी नंदन रहाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर शाळेचे प्राचार्य प्र. ला. ठोके यांनी शाळेबाबत माहिती दिली. शाळेचे माजी विद्यार्थी हे शाळेची खरी संपत्ती असल्याचे ते म्हणाले. तर संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य मधुकर जगताप यांनी संस्थेच्या शतक महोत्सवाच्या संपन्न झालेल्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी शाळेचे शिक्षक सुभाष पवार, भरत भालेराव, नितीन भांड, ज्ञानेश्वर रंधे, ज्ञानेश्वर डंबाळे, अंबादास नागपुरे, रु पाली झोडगेकर, विलास सोनार आदी उपस्थित होते.
आठवणींमध्ये रममाण
मेळाव्यास बंगळुरू, पुणे, मुंबई, रत्नागिरी या ठिकाणांहून बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्व विद्यार्थी साधारण ६५-६६ वयोगटातील होते मात्र पन्नास वर्षांनंतर प्रथमच भेटत असूनही हे विद्यार्थी एकमेकांना पूर्ण नावाने ओळख देत होते. सध्या बंगळुरूमध्ये स्थायिक असलेल्या राजलक्ष्मी रामन नाशिकमधील मुकुंद कोकीळ, प्रतिभा तुळापूरकर, सुधीर महाजन यांच्या पुढाकाराने सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात आले. विविध पदांवरून सेवानिवृत्त झालेले सध्या व्यवसायात असलेले हे विद्यार्थी शाळेत आल्यावर भारावून गेले व आठवणींमध्ये रममाण झाले.