करंजी येथे बिबट्याच्या दोन बछड्यांची आईशी घडवून आणली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 01:40 PM2020-12-22T13:40:46+5:302020-12-22T13:42:00+5:30

निफाड : तालुक्यातील करंजी येथे ऊसतोड सुरू असतांना उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्यात वनविभागाला यश आले आहे.

A visit to the mother of two leopard cubs at Karanji | करंजी येथे बिबट्याच्या दोन बछड्यांची आईशी घडवून आणली भेट

करंजी येथे बिबट्याच्या दोन बछड्यांची आईशी घडवून आणली भेट

Next

निफाड : तालुक्यातील करंजी येथे ऊसतोड सुरू असतांना उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्यात वनविभागाला यश आले आहे.
सोमवार दि २१ रोजी तालुक्यातील करंजी येथील काळू फकिरा अडसरे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असतांना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे मिळून आले. हे बछडे अंदाजे १५ ते २० दिवसाचे आहेत. ही घटना अडसरे यांनी वन विभागाला कळवली. त्यानंतर तातडीने येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, मनमाडचे वनपाल भगवान जाधव , वनरक्षक सुनील महाले , वनरक्षक गोपाळ हारगावकर, वनसेवक भय्या शेख, नारायण वैद्य आदींचे पथक करंजी येथे पोहचले. या बछड्याना निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. बछडे उसाच्या क्षेत्रात न दिसल्यास बछड्याची माता व्याकुळ होईल, बिबट्या हिंसक होऊन जवळील नागरिकांवर हल्ला करू शकते या कारणास्तव बछडे पुन्हा अडसरे यांच्या उसाच्या शेतात ठेवण्यात आले.

दि २१ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वनविभागाचे अधिकारी शेतात पोहचले. या ठिकाणी दोन बछडे एका कॅरेटमध्ये ठेऊन त्यावर लोखंडी जाळी ठेवण्यात आली. या जाळीला एक दोरी बांधण्यात आली व ही दोरी एका कर्मचाऱ्याच्या हातात दूर अंतरावर देण्यात आली. विशेष म्हणजे वरील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे पथक घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर वन विभागाच्या वाहनांमध्ये बसून होते व उच्च क्षमतेच्या नाइट मोड कॅमेऱ्यातून बछडे ठेवलेल्या घटनास्थळाचे निरीक्षण करीत होते. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
-------------------

मायेची ममता....
बछड्याच्या ओढीने व्याकुळ झालेली बिबट्याची मादी घटनास्थळाजवळ आली. यावेळी जाळी लावलेल्या कॅरेटमधून बछड्याचा व्याकुळ झालेला आवाज ऐकून ही मादी कॅरेट जवळ गेल्यानंतर तातडीने जाळीची दोरी खेचून बछड्यास मोकळे करण्यात आले. बछडे पाहून धावतच मादी बिबट्या बछड्याजवळ गेली व आईच्या वात्सल्याने यातील एका बछड्याला आपल्या तोंडात घेऊन निघून गेली, परंतु आपण एक बछडे तोंडात घेऊन गेली परंतु दुसऱ्या बछड्याचे काय होईल, या ममतेच्या भावनेने १० ते १५ मिनिटात ही मादी पुन्हा तोंडात धरलेल्या बछड्याला घटनास्थळी घेऊन आली. एकाच वेळी दोन्ही बछडे तोंडाने उचलण्याचा प्रयत्न करू लागली मात्र दोन्ही बछडे एकाच वेळी उचलणे तिला शक्य झाले नाही. त्यामुळे तिने पुन्हा एकच बछडे तोंडात घेऊन ती निघून गेली. त्या बछड्याला सुरक्षित जागी ठेऊन १५ मिनिटांनी पुन्हा दुसऱ्या बछड्याजवळ आली. त्या बछड्याला तोंडात धरून निघून गेली, त्यानंतर हा सर्व घटनाक्रम संपल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यातील एक बछडा नर दुसरा बछडा मादी आहे.

---------------------------
बिबट्याचे बछडे ताटातूट झालेल्या ठिकाणी जाळीत ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावून माय लेकरांची भेट घडवून आणण्याचा हा राज्यातील दुर्मिळ प्रयोग यशस्वी ठरल्याचा आम्हाला आनंद मिळाला आणि समाधान मिळाले आहे. ताटातूट झालेल्या आई आणि बछडे यांची भेट प्रत्यक्ष पाहणे ही बाब खूप भावनिक आणि समाधानाची होती.
- संजय भंडारी - वनपरिक्षेत्र अधिकारी ,येवला वन विभाग

Web Title: A visit to the mother of two leopard cubs at Karanji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक