मुंबईमध्ये भेट : एलबीटीसह विविध विषयांची केली मांडणी
By admin | Published: April 16, 2015 12:33 AM2015-04-16T00:33:05+5:302015-04-16T00:34:41+5:30
निमा शिष्टमंडळाची सचिवांशी चर्चा
सातपूर : एलबीटीच्या दरपत्रकातील वर्गवारीत सुधारणा करण्यात यावी, त्यात सुसूत्रता आणावी, कच्चा मालास नियमाप्रमाणे सवलत मिळावी, यांसह विविध विषयांवर निमाच्या शिष्टमंडळाने नगरविकास सचिव गोविंद लोखंडे यांची मुंबईला भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
नाशिक औद्योगिक क्षेत्राला कच्चा मालास सव्वा टक्के सवलतीस शासनाची मान्यता होती. परंतु त्याचा पूर्णपणे खुलासा नसल्याने महानगरपालिका आणि उद्योजक संभ्रमात आहेत. एल.बी.टी.च्या दरपत्रकातील वर्गवारीत सुधारणा करण्यात यावी आणि सुसूत्रता आणावी. निर्यात केलेल्या कच्चा मालावर एल.बी.टी. माफ असतो. वार्षिक विवरणपत्र भरताना लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात यावी व सुलभता आणावी. तसेच त्याला आॅडिटमधून वगळण्यात यावे व विवरणपत्रक भरल्यानंतर परतावा सहा महिन्यांत मिळावा, अशी मागणी निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, निमा एल.बी.टी. कमिटीचे अध्यक्ष सतीश कोठारी, निमा ऊर्जा समितीचे अध्यक्ष सुधाकर देशमुख आदिंनी राज्याचे नगरविकास उपसचिव गोविंद लोखंडे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. कच्चा मालाच्या सवलतीचे दर कायम असल्याबद्दलचे पत्र आठवडा भरात देण्यात येईल. तसेच निर्णय केलेल्या कच्चा मालावर एल.बी.टी. माफ असतो. माल निर्यातीच्या एकूण टक्केवारीप्रमाणे एल.बी.टी.चा परतावा देण्यास हरकत नाही, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास उपसचिव गोविंद लोखंडे यांनी दिली असून, पुढील आठवड्यात पुन्हा भेटीला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी दिली. (वार्ताहर)