प्रतापदादा सोनवणे भुजबळांच्या भेटीला
By admin | Published: September 7, 2014 12:37 AM2014-09-07T00:37:59+5:302014-09-07T00:38:22+5:30
प्रतापदादा सोनवणे भुजबळांच्या भेटीला
नाशिक : लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्याने नाराज झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी आज भुजबळ फार्म येथे धडकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस समीर भुजबळ यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना सोनवणे यांच्या या भेटीने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
गत लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघासाठी प्रताप सोनवणे यांना तिकीट नाकारत भाजपाने डॉ. सुभाष भामरे यांना संधी दिली. तेव्हापासून सोनवणे नाराज असल्याचे बोलले जात होते. विधानसभेत संधी दिली जाईल, असे त्यांना पक्षाने आश्वासन दिल्याचेही दरम्यानच्या काळात सांगितले जात होते. मात्र नाशकातील पूर्व आणि पश्चिममध्ये पक्षातर्फे असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता संधी मिळेलच याची शक्यता नसल्याने प्रतापदादा सोनवणे यांनी आज थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेले भुजबळ फार्म गाठल्याची चर्चा आहे. त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस,
माजी खासदार समीर भुजबळ यांची
भेट घेतली. उभयंतात सुमारे तासभर
चर्चा झाली. मात्र त्याचा अधिकृत तपशील कळू शकला नाही.
विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असतांना सोनवणे-भुजबळ यांच्या भेटीने उलटसुलट चर्चेला जोर आला आहे. त्यातच सद्यस्थितीत सिडको आणि सातपुर या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडे देखील सक्षम उमेदवार नसल्याच्या पार्श्वभुमीवर सोनवणे-भुजबळ यांची झालेली भेट व गोपनीय चर्चा यातून सोनवणे यांच्या आगामी राजकीय भवितव्याची चर्चा रंगु लागली आहे.