शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी
By admin | Published: October 16, 2016 10:48 PM2016-10-16T22:48:52+5:302016-10-16T22:51:35+5:30
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी
नंदकुमार : निफाड गटाचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पदसायखेडा : ज्ञानरचनावाद पद्धतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन केल्यास विद्यार्थी प्रभुत्व पातळीपर्यंत सहज पोहचतो. असे शैक्षणिक काम निफाड गटातील प्राथमिक शिक्षक करत असल्याचे गौरवोद्गार शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी काढले. निफाड तालुक्यातील कुरडगाव येथील प्राथमिक शाळेतील भेटीप्रसंगी नंदकुमार बोलत होते.
१५ आॅक्टोबर हा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस शिक्षण विभागाने वाचन दिन म्हणून राज्यात साजरा केला. या दिवसाचे औचित्य साधून अनेक अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या.
प्रत्यक्ष विद्यार्थी वाचन दिन कसा साजरा करतात याचे निरीक्षण केले. याच अनुषंगाने शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी कुरडगाव शाळेत अचानक भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रवीण अहेर, निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, बिट विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोडे, विजय बागुल उपस्थित होते.
यावेळी कुरडगाव शाळेतील मानाचा तुरा रोवणारे मुख्याध्यापक अंबादास म्हस्के, आरती बैरागी, माधुरी कुमावत, केंद्रप्रमुख एस. जे. चित्ते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)